विशेष प्रतिनिधी
नरेडकोच्या होमेथॉन एक्सपोमध्ये मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई,राज्यातील विकासकांनी जनतेला परवडणारी घरे द्यावीत, मुंबईसह उपनगरात घरे बांधताना सर्वसामान्य माणसाचा विचार करावा पोलिसांचा विचार करावा तसेच यापूर्वी ज्या पद्धतीने स्टॅम्प ड्युटी मध्ये सवलत दिली त्या पद्धतीने आणखी काही करता येईल का याचा विचार राज्य शासन नक्की करेन असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेड को ने आयोजित केलेल्या होमेथॉन एक्सपो मध्ये बोलताना दिले. नरेडकोच्या वतीने बीकेसी येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर मध्ये होमेथॉन एक्सपो 2022 या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनाच्या अंतिम दिवशी उपस्थित राहून मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
राज्य सरकार जनतेच्या हिताची कामे करीत असून पायाभूत सुविधांवर अधिकाधिक आम्ही भर देत आहोत ज्या राज्याच्या पायाभूत सुविधा अधिक असतात ते राज्य प्रगतीपथावर असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यात मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी सुरू आहे या योजनेची अंमलबजावणी करण्यात राज्य देशात सर्वात मोठे आहे असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना केला.
राज्यातील विकासकांनी सर्वसामान्य जनतेचा विचार करून परवडणारी घरे तयार करावीत. जास्तीत जास्त परवडणारी घरे तयार झाल्यास त्याचा जनतेला फायदा होईल आणि विकासकांनाही त्याचा फायदा कसा होईल याबाबत राज्य सरकार नक्कीच विचार करेल. विकासकांनी आपली सामाजिक जबाबदारी उचलून जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या पोलीस बांधवांसाठी घरे बांधावीत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त सवलतीच्या दरात घरे निर्माण करावीत अशी विनंती ही यावेळी मुख्यमंत्र्यांनी नरेडकोच्या कार्यक्रमात केली.
यावेळी नरेंद्र कोच्यावतीने संदीप रुणवाल आणि राजेश बांदलकर यांनी स्टँड ड्युटी कमी करावी अशी विनंती राज्य सरकारकडे केली त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की कशा पद्धतीने स्टॅम्प ड्युटीचे नियोजन केल्यास राज्याचा महसूल वाढेल आणि ग्राहकांवरील बोजा कमी होईल याचे योग्य नियोजन करा आणि ते आम्हाला सादर करा सरकार त्याबाबत सहानुभूतीने नक्की विचार करेल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. रियल इस्टेटच्या उद्योगात 9000 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आपल्याला समजली असून हे अत्यंत आनंदाची बाब आहे यापुढेही असेच काम होत राहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
दरम्यान,यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रास्ताविकाच्या भाषणात बोलताना संदीप रुणवाल यांनी सांगितले की राज्य सरकारने विकासकांना मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. राज्य सरकारच्या विकासात प्रति असलेल्या मदतीच्या भूमिकेचे आम्ही नरेडकोच्या वतीने स्वागत करतो. मात्र सध्या गृहप्रकल्पांवर असलेली सहा टक्के स्टॅम्प ड्युटी ही कमी केल्यास त्याचा ग्राहक आणि विकासक या दोघांना फायदा होईल त्या दृष्टीने सरकारने पावले उचलावीत. स्टॅम्प ड्युटी कमी केल्यास राज्यातील ग्राहकांना कमी किमतीत घरे उपलब्ध करून देता येतील, अशी विनंती रुणवाल यांनी यावेळी केली.
यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह नरेडकोचे अनेक प्रतिष्ठित उपस्थित होते. बीकेसी येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय होमेथॉन एक्सपो मध्ये अनेक विकासकांनी प्रदर्शनात सहभाग घेतला तसेच नागरिकांनीही या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
Show quoted text