जातनिहाय जनगणनेचा निर्णय राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय- वर्षा गायकवाड.

Share

प्रतिनिधी :मिलन शहा

मुंबई, दि. 30 एप्रिल
केंद्रातील तानाशाही मोदी सरकारला अखेर काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांच्या मागणीपुढे झुकावे लागले आहे. जातनिहाय जनगणना करण्याचा मोदी सरकारचा निर्णय हा केवळ सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊलच नाही तर राहुल गांधींची दूरदृष्टी, विचारसरणी आणि सततच्या संघर्षाचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

यासंदर्भात बोलताना खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती. “ज्यांची जेवढी लोकसंख्या जितका वाटा, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली होती. हा फक्त आकडेवारीचा प्रश्न नाही तर देशातील कोट्यवधी वंचित, दलित आणि आदिवासींना ओळख आणि अधिकार प्रदान करण्याच्या दिशेने घेतलेला ऐतिहासिक निर्णय आहे.

जातनिहाय जनगणना करण्यास सरकारला भाग पाडू अशी आग्रही भूमिका राहुल गांधी यांनी संसदेत व संसदेबाहेरही घेतली होती. भाजपा सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले होते पण अखेर मोदी सरकार नरम झाले व राहुल गांधी यांची मागणी किती रास्त आहे यावर शिक्कामोर्तब केले आहे.

काँग्रेसने नेहमीच सामाजिक न्यायासाठी लढा दिला आहे. राहुल गांधी यांनी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेल्या सामाजिक न्याय आणि समानतेच्या स्वप्नाला आणखी एक आयाम दिला आहे आणि मनुवादी शक्तींना पुन्हा एकदा नतमस्तक व्हावे लागले आहे. कोरोना महामारीच्या गंभीर संकटाचा इशाराही राहुल गांधी यांनी दोन महिने आधीच दिला होता पण मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले होते असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.


Share

4 thoughts on “जातनिहाय जनगणनेचा निर्णय राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय- वर्षा गायकवाड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *