जिल्हा परिषदेतील 13हजार जागांची भरती प्रक्रिया लवकर राबवावी, काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस.

Share

प्रतिनिधी :मिलन शाह

जिल्हा परिषदेतील विविध विभागातील 13 हजार 551 रिक्त पदांच्या भरतीचा तिढा अजून सुटलेला नाही. या नोकर भरतीसाठी तब्बल 12 लाख इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरलेले असुन मागील तीन वर्षापासून ही भरती प्रक्रिया रखडलेली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने ही भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करून नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांना न्याय द्यावा, अशी मागणी मातंग समाजाचे नेते व काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 8 हजार जागांची भरती प्रक्रिया सुरु झाली असून तशी जाहिरातही प्रसिद्ध झाली आहे. पण जिल्हा परिषदेतील जागांसाठी अर्ज भरून तीन वर्ष झाली तरी भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही. 12 लाख उमेदवारांनी अर्जासोबत भरलेल्या शुल्कापोटी तब्बल 25 कोटी रुपये राज्य सरकारकडे जमा आहेत. नोकर भरती रखडल्याने अर्ज भरलेल्या तरुणांमध्ये संतापाची भावना आहे. नोकर भरती आणखी रखडली तर काही उमेदवारांना वयोमर्यादा संपेल अशी भितीही वाटत आहे. ही नोकर भरती तातडीने घ्यावी यासाठी विद्यार्थी आंदोलनही करत आहेत.
बेरोजगारीचे प्रमाण खूप मोठे आहे, तरुणवर्ग नोकरीच्या प्रतिक्षेत असतो पण पदांची संख्या व इच्छुक यांच्यात खूप मोठी तफावत आहे. पोलीस दलातील 18 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु होताच तब्बल 18लाख उमेदवारांनी त्यासाठी अर्ज केले. पोलिस शिपाई पदासाठीसुद्धा उच्च शिक्षित तरुणांनी अर्ज केले. सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत वर्षानुवर्षे असलेले तरुण नोकरी भरतीची जाहिरात प्रसिद्ध होताच लाखोंच्या संख्येने अर्ज भरतात पण सरकारी दिरंगाईमुळे नोकर भरती रखडते. राज्य सरकारने 75 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला, ही नोकरी भरती प्रक्रियाही सरकारी दिरंगाईमुळे संथगतीनेच सुरु आहे.
जिल्हा परिषदातील 13 हजार जागांच्या भरतीचा प्रश्न तातडीने मार्गी लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तरुणांचे नोकरीचे स्वप्न पुर्ण करावे असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले..


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *