जॉय ऑफ गिविंग एक अनोखी चळवळ…

Share

प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले

जॉय ऑफ गिव्हिंगचे रोपटे आज वटवृक्ष बनले आहे. सामाजिक जाणीवेतून जोडल्या गेलेल्या संवेदनशील मनांची चळवळ बनली आहे. आपली नोकरी, प्रपंच सांभाळून सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेल्या गणेश हिरवे यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या जॉय संस्थेची वाटचाल आज सर्वांसाठीच अनुकरणीय बनली आहे. सोशल वर्क म्हणजे समाजसेवा हे आजच्या काळात केवळ प्रसिद्धी, स्वार्थ याचे प्रतीक समजले जाते. सध्या समाजात प्रामाणिक, निस्वार्थ समाजसेवेपेक्षा केवळ स्वार्थ, प्रसिद्धी व हेतूपूरस्कर इतरांसाठी काहीतरी करणाऱ्या प्रसिद्धीलोलुप कथित ‘समाजसेवकांना’ पाहिले तर ते काही अंशी खरेदेखील आहे. मात्र समाजातील गरीब, दुर्बल व गरजू लोकांसाठी निस्वार्थीपणे काहीतरी करण्याची मनिषा बाळगणारे लोकदेखील आपल्यात आहेत हेदेखील सत्य नाकारून चालणार नाहीे. त्यामुळे सामाजिक कार्य साकारणाऱ्या सर्वच लोकांना आपण एकाच तराजूत जोखण्यात तसा काही अर्थ नाही. तसे झालेच तर समाज कोलमडून पडेल व उरतील ती फक्त स्वतःपुरते विचार करणारी मतलबी माणसे. त्यामुळे कोणताही स्वार्थ वा हेतू न ठेवता इतरांसाठी काहीतरी करण्याची इच्छा ठेवणाऱ्या व्यक्तींना, संस्थांना व संघटनांना समाजाने उदात्त हेतूने स्वीकारायला हवे व त्यांच्या कार्याची दखल घ्यायला हवी असे माझे प्रामाणिक मत आहे. ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ हा आमचा सोशल ग्रुप गेल्या काही वर्षांपासून निस्वार्थी भावनेने सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहे. विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या दोनशेहून अधिक मान्यवर सदस्यांचा समावेश असलेला हा ग्रुप अनाथाश्रम, वृद्धाश्रम, आश्रमशाळा, झोपडपट्टी- आदिवासी भागातील लोकांसाठी अनेक समजोपयोगी उपक्रम राबवत आहे व अनेकानेक आशिर्वाद मिळवत आहे. या आशीर्वादाचे, समाधानाचे वाटेकरी आज संस्थेला मदत करणारे असंख्य हात आहेत. मुंबई व उपनगरांतील अनेक लोक या ग्रुपशी जोडले गेलेले आहेत ज्यांच्या माध्यमातुन सातत्याने लोकोपयोगी उपक्रम मुंबई, उपनगरे, पालघर, रायगड, ठाणे या परिसरात राबविण्यात येत आहेत. मीदेखील या ग्रुपचा एक सभासद आहे याचा मला निश्चितपणे सार्थ अभिमान आहे. याचे संपूर्ण श्रेय संस्थेचे सर्वेसर्वा व आम्हा सर्वांना एकत्र जोडून ठेवणारे गणेश हिरवे यांनाच जाते. गेल्या आठ दहा वर्षांपासून आम्ही संपर्कात आहोत. नवी मुंबई, ठाणे, पालघर मध्ये अनेक सामाजिक उपक्रम हिरवे सरांच्या सोबतीने राबवता आले. ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागातील मुलांना मदत पोहोचवता आली. खरेतर आपल्यासारख्या कुटुंबवत्सल लोकांना कुटुंब, नोकरी वा व्यवसायिक जबाबदाऱ्यातुन वेळ काढणे म्हणजे एक दिव्यच. त्यातून वेळ मिळालाच तर आपण एखादा आवडीचा छंद जोपासतो. माझेच उदाहरण घेतले तर कौटुंबिक व्याप व नोकरीतील व्यस्तता यातून दररोजच्या लिखाणासाठीदेखील वेळ काढणे जिकरीचे ठरते. त्यातुनच मग लोकलप्रवासात लिखाण करण्याचा मध्यम मार्ग मी निवडला व याच लोकल प्रवासामुळे लिखाणाचा छंद आज जोपासून आहे. हा लेखदेखील परवा लोकलप्रवासातच लिहिला आहे. असो, तर दैनंदिन व्यापातून वेळ काढून सामाजिक बांधिलकी जोपासणे व समाजकार्यात स्वतःला झोकून देणे हा विचार सर्वसामान्य व्यक्ती करूच शकत नाही. त्यातून समाजसेवा म्हटली की पदरमोड आली जी प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडताना सर्वांना जमेलच असे नाही. मात्र गणेश हिरवे सरांचे आजवरचे कार्य व त्यांची त्यातील तत्परता आपण जर पहिली तर हा माणूस इतक्या साऱ्या गोष्टी इतक्या सहजपणे कशा करू शकतो याचे मला खरेतर अप्रूप वाटते. पत्रलेखनाच्या माध्यमातून आपले सामाजिक जीवन सुरू करणाऱ्या हिरवे सरांचा मूळ पेशा शिक्षकी आहे. ज्ञानदानातील अद्वितीय कामगिरीमुळे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. सामाजिक कार्य व पत्रलेखनासाठी त्यांना आजवर शंभरहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. रक्तदानाने महत्व व सामाजिक गरज ओळखून त्यांनी आतापर्यंत स्वतः ४५ वेळा रक्तदान केलेले आहे. जोगेश्वरी येथे वास्तव्य करणारे हिरवे सर परिसरातील प्रत्येक सामाजिक, धार्मिक, राजकीय व क्रीडाविषयक उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेतात त्यामुळेच त्यांचा जनसंपर्कदेखील खूप दांडगा आहे. माणसे जोडण्याचा त्यांना मोठा छंद आहे. निस्वार्थी भावनेने समाजकार्य करणारी अनेक माणसे त्यांनी आपल्या जॉय ऑफ गिव्हिंग या सोशल माध्यमातील ग्रुपद्वारे जोडलीत ज्यांच्या माध्यमातून त्यांनी अनाथ, वृद्ध, गरीब लोकांसाठी अनेक उपक्रम साजरे केले आहेत. सामाजिक बंधीलकीतून आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून लोकवर्गणीतून व प्रसंगी स्वतःची पदरमोड करून त्यांनी गरजूंना मदत केली आहे. आणि म्हणूनच मी त्यांच्या या उपक्रमांचा भाग आहे याचा मला खूप अभिमानच वाटतो. जोगेश्वरी येथील श्री समर्थ विद्यालय स्कूल कमीटीचे ते सभासद आहेत. राजहंस प्रतिष्ठान, गोरेगावचे सभासद असून त्या माध्यमातून अवयवदान व देहदान चळवळीसाठी त्यांनी सक्रिय योगदान दिलेले आहे. माजी पोलीस आयुक्त श्री वसंत ढोबले साहेब यांच्या मिसिंग पर्सन ब्यूरो या हरवलेलया व्यक्ति शोधून काढणाऱ्या NGO चेदेखील ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. जॉय ऑफ गिविंग या सामाजिक संस्थेचे संस्थापक, मुंबईतील विविध सामाजिक संस्था व उत्सव मंडळांवर सल्लागार, दै मुंबई मित्र चे प्रतिनिधी, संत निरंकारी आध्यात्मिक मिशन चे सक्रिय कार्यकर्ते, एपीजे अब्दुल कलाम मोफत वृत्तपत वाचनालयाचे संस्थापक व संत नामदेव परीवाराचे कार्यकर्ते असा त्यांचा सामाजिक क्षेत्रातील प्रवास व लेखाजोखा आहे. इतका सारा व्याप सांभाळून ते आपल्या मित्रमंडळीबरोबर कायम संपर्कात राहतात व विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करतात, त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. हिरवे सरांबरोबर मी गेली अनेक वर्षे संपर्कात असून सामाजिक उपक्रमाच्या अनेक मोहिमा आम्ही एकत्र आखल्या आहेत. जॉयच्या शिलेदारांच्या साथीने आजवरच्या सर्वच मोहीमा आम्ही यशस्वी करून हजारो गरजूंना सहकार्य केलेले आहे. एखादा ज्वलंत विषय घेऊन अधूनमधून मला आवर्जून भेटतात, फोन करतात व आपली भूमिका वृत्तपत्रांच्या माध्यमातून मांडण्यासाठी बजावतात. अत्यंत प्रामाणिक हेतूने समाजासाठी झोकून देऊन काम करणारी गणेश हिरवे सरांसारखी माणसे खरेतर या मतलबी जगात दुर्मिळच असून त्यामुळेच आम्हाला त्यांचा हेवा वाटतो. सामाजिक सेवेतील व्यापातून पुरेसा वेळ काढून त्यांनी आपले कौटुंबिक स्वास्थ्यदेखील उत्तम जपले आहे. पत्नी व दोन मुले असा त्यांचा परिवार असून त्यांच्याशी बोलताना नेहमीच त्यांची परिवराप्रति असलेली एक अतूट जोड व निसंदिग्ध प्रेमभावना प्रकट होते. माझ्यातील वृत्तपत्रलेखक जागता ठेवण्यामध्ये हिरवे सरांचा खूप मोठा वाटा असून त्याबद्दल माझ्या मनात त्याचेंबद्दल नितांत आदर आहे. मला सामाजिक कार्याची आवड निर्माण करण्यामागे हिरवे सरांचा मोठा वाटा आहे. ह्या कार्याची आता इतकी सवय लागलीय की गरजूंना मदत करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असतो. मित्रमंडळी, हितचिंतक यांच्यामार्फत गरजूंसाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत असतो. मध्ये हिरवे सरांच्या आजारणात त्यांच्या अनुपस्थितीतदेखील जॉयच्या माध्यमातून अनेक उपक्रम साजरे करण्याची जबाबदारी घेतली व पेललीदेखील. आज जॉय चा १०वा वर्धापन दिन साजरा होत असताना जॉयच्या मागील दहा वर्षाच्या कारकिर्दीत घेतलेले असंख्य उपक्रम एखाद्या वेब सिरीजसारखे डोळ्यासमोरून जातात. सामाजिक उपक्रमांचे एकामागोमाग किती सिझन आम्ही घेतले याची गिणतीही करणे आता सोडून दिलेय. एक उपक्रम झाला की पुढच्या उपक्रमाची तयारी सुरू होते. याला संस्थेचे इतर सदस्य देत असलेली साथ अविस्मरणीय आहे. ग्रुपमधील सभासदांच्या सहयोगाशिवाय इतके मोठे शिवधनुष्य पेलणे शक्यच नाही. मात्र प्रत्येक उपक्रमात सढळ हस्ते योगदान देण्यात जॉयचे सभासद, हितचिंतकांनी कधीही मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळे जॉयच्या आमच्या सर्वच साथीदारांचे योगदान कधीही नाकारता येणार नाही. आज ह्या १०व्या वर्धापन दिनाचे खरे मानकरी जॉयला साथ देणारी, योगदान देणारी, जॉयच्या वाटचालीत खांद्याला खांदा लावून चालणारी ही सर्व मंडळी आहेत. ही चळवळ आता थांबणार नाही, अनेक हातांचे बळ मिळवत ती पुढे चालतच राहणार आहे. जॉयच्या ह्या वाटचालीत साथ देणाऱ्या सर्व सभासद, हितचिंतक, पत्रकार, समाजसेवक, मित्रमंडळी, संस्था यांना मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा !
वैभव मोहन पाटीलनवी मुंबई समन्वयक – जॉय ऑफ गिव्हिंग

यांनी माहिती दिली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *