एसएमएस -प्रतिनिधी -कृष्णा वाघमारे
मुंबई :आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित दिवाळी अंक स्पर्धेत जॉय दिवाळी अंकाला अक्षरआनंद दिवाळी अंक पुरस्कार २०२५ जाहीर झालेला आहे. यंदा प्रथमतःच प्रकाशित करण्यात आलेल्या जॉय दिवाळी अंकाचे संपादन वैभव पाटील आणि गणेश हिरवे ह्यांनी केले असून जॉय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ते समाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. जॉय संस्थेच्या माध्यमातून सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असून त्याचा लाभ आदिवासी व गरजू भागांतील अनेक विद्यार्थी, अनाथालये, वृद्धाश्रम यांना झालेला आहे. संस्थेमार्फत प्रकाशित दिवाळी अंकाला जाहीर झालेला पूरस्कार, कल्याण येथे आयोजित अखंड वाचनयज्ञ समारोप सत्रामध्ये शनिवार दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता मंदिर संस्था सभागृह, टिळक चौक पोस्ट ऑफिस जवळ, कल्याण पश्चिम येथे प्रदान करण्यात येणार आहे. ह्या स्पर्धेचे परीक्षण मान्यवर परीक्षकांनी केलेले असून पुरस्कारासाठी जॉय दिवाळी अंकाची निवड झाल्याबद्दल आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हेमंत नेहते यांनी संपादकीय मंडळाचे अभिनंदन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची छबी असलेल्या जॉय दिवाळी अंकाला पहिल्याच वर्षी हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याने जॉय सामाजिक संस्थेच्या सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दिवाळी अंकासाठी योगदान देणाऱ्या सर्व सभासद, लेखक, कवी, देणगीदार, जाहिरातदार यांचे कार्यकारी संपादक गणेश हिरवे यांनी अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहेत.

Good
Good