
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई: कांदिवली चारकोप येथे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानवर्धिनी विद्यालय, चारकोप येथे “आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठान” आणि “ग्रंथ तुमच्या दारी” यांच्या सहकार्याने “वाचन प्रेरणा दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कवी व पेट्रोलियम उद्योगातील सेवानिवृत्त अधिकारी मा. श्री. संतोष साळुंखे आणि स्थानिक स्कूल कमिटी सदस्य मा. श्री. महादेव भिंगार्डे साहेब होते.
तसेच पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ. माली मॅडम, “आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठान”च्या सल्लागार श्रीमती परिणीता माविनकुर्वे, माजी विद्यार्थी संघटना सदस्य श्री. संदीप जोशी, कु. वैष्णवी पांचाळ व जयेश पांचाळ उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. मुख्याध्यापक मा. डी. सी. गावित सरांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सूत्रसंचालन श्री. व्ही. व्ही. पाटील सरांनी केले.
इयत्ता 5 वी ते 10 वीतील विद्यार्थ्यांनी कविता, निबंध, गोष्टी, संभाषण व समूहवाचनाद्वारे वाचनप्रेम व्यक्त केले. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील सादरीकरणांनी कार्यक्रम रंगतदार झाला. श्री. विजय शिंदे सरांनी डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनावर भाषण केले, तर श्री. गिरीश पंडोरिया सरांनी मराठी कविता सादर केली.
श्रीमती परिणीता माविनकुर्वे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वाचनातील लय, ताल, उच्चार व सुस्पष्टतेचे महत्त्व पटवून सांगितले. प्रमुख पाहुणे संतोष साळुंखे सरांनी “पुस्तक वाचनाने मला काय शिकवले?” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले. त्यांनी वाचनातून व्यक्तिमत्त्व विकास, विचारांची परिपक्वता आणि आत्मविश्वास यांचा विकास कसा होतो, हे सांगितले. त्यांनी स्वतः रचलेली “वेळ” ही कविता सादर करून वेळेचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. महादेव भिंगार्डे साहेबांनी मराठी भाषा आणि वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन “आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठान” आणि माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष व स्कूल कमिटी सदस्य श्री. घनश्याम देटके यांनी केले.
शाळेतील सहाय्यक शिक्षिका सौ. जाधव मॅडम, सौ. सावंत मॅडम, श्रीमती शेडगे मॅडम यांनी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी केली. तसेच श्री. गायकवाड हरेश व श्रीमती पूजा बाईत यांनी शाळा परिसर स्वच्छ ठेवून योगदान दिले. श्री. धुमाळ सर, श्री. पाटील सर आणि श्री. शिंदे सरांनी वटवृक्षाच्या सावलीत कार्यक्रम साकारून नैसर्गिक वातावरणात शोभा वाढवली.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवाळीच्या सणानिमित्त “आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठान”तर्फे पालकांना मिठाईचे वाटप करण्यात आले, तर शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना गोड लाडू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. डी. एस. धुमाळ सरांनी प्रमुख पाहुणे, मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
👉 ज्ञानवर्धिनी विद्यालयातील “वाचन प्रेरणा दिन” विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी, अभिव्यक्तीची प्रेरणा आणि सणासुदीचा आनंद जागवणारा ठरला. 📚✨
Good
खूपच छानआणि स्तुत्य
WOWW
Good