
प्रतिनिधी :मिलन शाह
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान देशाला देऊन सर्व जाती धर्मांच्या लोकांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे महान काम केले आहे. आतापर्यंत देशाचा कारभार लोकशाही व संविधानाच्या मार्गानेच केला जात होता परंतु मागील काही वर्षात लोकशाही व्यवस्था व संविधान धोक्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान वाचले तरच लोकशाही वाचेल व लोकशाही वाचली तरच आपले स्वातंत्र्यही अबाधित राहील त्यासाठी संविधान वाचवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे मातंग समाजाचे नेते व काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. बाबासाहेबांना अभिवादन करताना त्यांनी दिलेल्या संविधानाचे रक्षण करण्याची शपथ आपण घेतली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांचे विचार व त्यांनी देशाला दिलेले संविधान यांचा प्रचार व प्रसार घरोघरी झाला पाहिजे तसेच संविधान संपवण्याचे काम करणाऱ्या विचारधारेचा पराभव केला पाहिजे. एकीकडे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग भांडवलदारांच्या घशात घालून तेथील नोकऱ्या संपवल्या जात आहेत. जास्तीत जास्त रोजगार देणारे हे क्षेत्रच भांडवलदारांच्या घशात घातले तर आरक्षणाचा फायदा कितपत मिळेल? सरकारी नोकऱ्याच संपवण्याचा घाट घालून कंत्राटी पद्धत राबवण्याचा घातक पायंडाही घातला जात आहे. यामुळे आरक्षणातून मिळणाऱ्या नोकऱ्याही संपुष्टात येतील.
संविधानाने आपल्याला जगण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे, तेच हिरावून घेण्याचे काम काही पक्ष व संघटना करत आहेत हे लोकशाही व्यवस्थेला घातक आहे हा धोका लक्षात घेऊन संविधान अबाधित ठेवण्याचे काम आपल्याला करावयाचे आहे आणि संविधान वाचवणे हिच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खरी आदरांजली ठरेल, असे राजहंस म्हणाले.