तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीत?आदार सत्यजीत तांबे.

Share

प्रतिनिधी:वैशाली महाडिक
सध्याच्या तरुणांसमोरील सर्वात मोठी समस्या कोणती, असा प्रश्न विचारला तर ‘बेरोजगारी’ असं उत्तर हमखास मिळतं. पण दुसऱ्या बाजूला कंपन्यांना हवी तशी माणसं मिळत नसल्याचंही चित्र आहे. नेमक्या याच समस्येवर आ. सत्यजीत तांबे यांनी तरुणांना एक उपाय सुचवलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून आ. तांबे यांची ही क्लीप प्रचंड व्हायरल होत आहे. फक्त डिग्रीच्या कागदावर विसंबून राहू नका, त्याशिवाय इतरही कौशल्य आत्मसात करा. कंपन्या कुशल लोकांना प्राधान्य देतात, असं ते या व्हीडिओत म्हणत आहेत.

आ. सत्यजीत तांबे सोशल मीडियाच्या व्यासपीठावरून सातत्याने तरुणाईसमोरच्या प्रश्नांवर भाष्य करत असतात. नुकताच मुलींच्या आणि मुलींच्या वडिलांच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षांबाबतचा त्यांचा व्हीडिओ चांगलाच गाजला होता. आता पुन्हा एकदा अशाच एका व्हीडिओने तरुणांच्या मनाचा ठाव घेतला आहे. या व्हीडिओत आ. तांबे बेरोजगारी आणि रोजगाराच्या संधी याच्यावर भाष्य करत आहेत.

कोणत्याही कंपनीतील HR ला विचारलं, तर ते म्हणतात की त्यांना हवी तशी माणसंच उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे बऱ्याच जागा रिकाम्या आहेत. दुसऱ्या बाजूला तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो. या दोन्ही परस्परविरोधी बाबींचा विचार केला, तर एक गोष्ट आढळते. एखादी कंपनी जेव्हा एखाद्या उमेदवाराला नोकरी देते, तेव्हा त्याच्याकडे काही अंगीभूत कौशल्यं नसतील, तर पहिले सहा महिने कंपनीला त्याला घडवावं लागतं. या सहा महिन्यांत पगार धरून कंपनीचे दीड ते दोन लाख रुपये त्या उमेदवारावर खर्च होतात. त्यामुळे कंपन्या अकुशल उमेदवारांना संधी द्यायला तयार नसतात, अशी वस्तुस्थिती आ. तांबे या व्हीडिओतून मांडतात.

तरुणांनी फक्त हातातल्या पदवीच्या कागदावर अवलंबून न राहता त्यापलीकडे जाऊन विविध कौशल्यं आत्मसात केली पाहिजेत. ही कौशल्यं अगदी साधी आणि सोपी असतात. त्यात अगदी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करणं, मुद्देसूद बोलणं, संगणकाबद्दलची माहिती, मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा तत्सम सॉफ्टवेअरची माहिती आदींचा समावेश होतो. ही कौशल्यं उमेदवाराकडे असतील, तर कंपनीला त्याच्यावर फार गुंतवणूक करावी लागत नाही आणि त्याच्यासाठी रोजगाराचा मार्ग सहज खुला होतो, असंही आ. तांबे पोडतिडीकीने सांगताना दिसतात.

एखाद्या मोठ्या भावाने आत्मियतेने काहीतरी भलं सांगावं, तसं आ. सत्यजीत तांबे बोलतात. त्यामुळे तरुणही त्यांच्या व्हीडिओला प्रतिसाद देताना किंवा सत्यजीत यांचा उल्लेख करताना सत्यजीत दादा असाच करतात. त्यामुळे फक्त उमेदवार राहू नका, तर कुशल उमेदवार बना, हा त्यांचा सल्ला नक्कीच आत्मसात करू, अशा कमेंट्सही या व्हीडिओवर येताना दिसत आहेत.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *