एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई : शिक्षण निरीक्षक, ग्रेटर मुंबई (पश्चिम विभाग) आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२५–२६ चे आयोजन रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर (पश्चिम) येथे सोमवार, २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे.
या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना त्यांची जिज्ञासा, कल्पकता व विज्ञानाप्रतीची आवड प्रकल्प व मॉडेल्सच्या माध्यमातून सादर करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी शिकलेल्या विविध वैज्ञानिक सिद्धांत व पद्धती प्रत्यक्ष प्रयोगात्मक स्वरूपात मांडणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
पश्चिम विभागातील (वांद्रे ते दहिसर) ६ वॉर्डांमधील विजेते प्रकल्प विविध वयोगटांत या प्रदर्शनात सादर केले जाणार आहेत. शालेय स्तरावरील तरुण वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी “विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM (Science, Technology, Engineering & Mathematics)” ही यंदाच्या प्रदर्शनाची मुख्य संकल्पना (Theme) आहे. या दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनात १००० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. प्रकल्पांचे परीक्षण विविध महाविद्यालयांतील अनुभवी शिक्षक व प्राध्यापक करणार आहेत.
या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शास्त्रज्ञ श्री. ऋत्विक ठेंगेधर यांच्या हस्ते होणार असून, माजी आमदार श्रीमती मनीषा चौधरी (दहिसर विधानसभा मतदारसंघ) प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर डॉ. हनीफ कांजरे (रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल) हे समारंभाचे अध्यक्ष असतील.
या भव्य उपक्रमाचे आयोजन शिक्षण विभागातील मान्यवर अधिकारी —
श्री. संजय जवीर (शिक्षण निरीक्षक), श्री. धर्मेंद्र नाईक, श्रीमती निशा नायडू व श्री. सोफी लायक अहमद इक्बाल अहमद (उपशिक्षण निरीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. मान्यवरांना आमंत्रित करण्याची जबाबदारी श्री. संजय पाटील, डॉ. रियाझ खान, श्री. आशिष वशी, श्रीमती सबा पटेल, श्री. सचिन गवळी, श्रीमती मिनल सरकाळे तसेच यजमान शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती किरण वर्मा यांनी पार पाडली.
या दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप मंगळवार, २१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता होणार असून, या वेळी विजेत्या शाळा व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. समारोप समारंभास श्री. जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर (शिक्षक आमदार, मुंबई विभाग) प्रमुख पाहुणे म्हणून, श्री. राजेश कंकाळ (शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग) विशेष अतिथी म्हणून आणि डॉ. हनीफ कांजरे समारंभ अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हे विज्ञान प्रदर्शन म्हणजे केवळ प्रकल्पांचे सादरीकरण नसून, शिक्षण, संशोधन व वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्याचा एक प्रेरणादायी उत्सव असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.
Good