प्रतिनिधी :वैशाली महाडिक

मुंबई,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून विवेकी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यात निर्घृणपणे खून करण्यात आला, या घटनेला आता दहा वर्षे पूर्ण झाली. तरी अजूनही त्यांच्या खूनाच्या सूत्रधाराचा शोध लागत नाही व त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंनिसच्या वतीने आज शनिवार, दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 4ते 6 या वेळेत दादर येथील वीर कोतवाल उद्यान येथे निर्भय आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव नंदकिशोर तळाशिलकर यांनी सांगितले की ‘ जोपर्यंत डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुन्यांच्या सूत्रधाराला पकडले जात नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन व शासकीय पातळीवरील पाठपुरावा चालूच ठेवणार आहोत.’
या आंदोलनात मुंबईतील व आजूबाजूच्या परिसरातील महाराष्ट्र अंनिसच्या शाखांचे कार्यकर्ते व सिपीआय , बीएसपी , एआयएसएफ, सीजेपी , राष्ट्र सेवा दल, विद्यार्थी भारती, छात्र भारती, अनुभव शिक्षा केंद्र, विद्रोही सांस्कृतिक मंच, भारतीय महिला फेडरेशन, जनता दल (से), संविधान प्रचारक लोकचळवळ, इत्यादी समविचारी, परिवर्तनवादी संघटना आणि हितचिंतक व मानवतावादी नागरिक सहभागी झाले होते.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्राध्यापक कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा कधी होणार आणि या खूनांच्या सूत्रधाराला अटक कधी होणार? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी केला. तसेच यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले आहे. राज्यभर यासंदर्भातील निवेदने, आंदोलन आणि निर्धार रॅली आयोजित करण्यात येत आहेत.
अशी माहिती सचिन थिटे -राज्य सरचिटणीस-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी दिली.