‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विरोधात पत्रकार परिषद ..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले.

मुंबई : महाराष्ट्र मंत्रिमंडळाने नुकतेच मंजूर केलेल्या ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६’ (Anti-Conversion Bill) विरोधात विविध नागरी संघटना आणि नागरिकांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली आहे. ही पत्रकार परिषद आज (११ मार्च) दुपारी ३ ते ५ या वेळेत मुंबई प्रेस क्लब येथे होणार आहे.
या विधेयकाच्या माध्यमातून जबरदस्तीने किंवा फसवणूक करून धर्मांतर रोखण्याचा उद्देश असल्याचे सरकारकडून सांगितले जात असले, तरी हे विधेयक कोणतीही सार्वजनिक चर्चा किंवा सल्लामसलत न करता गुप्तपणे आणले जात असल्याबद्दल नागरी संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. विधेयकाचा मसुदा अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नसल्याने त्यावर चर्चा, अभ्यास किंवा लोकसहभागाची संधी मिळालेली नाही, असेही संघटनांचे म्हणणे आहे.
तसेच देशातील विविध राज्यांतील अशा कायद्यांचा अनुभव पाहता, या कायद्यांचा वापर आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना, अल्पसंख्याकांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना त्रास देण्यासाठी होण्याची शक्यता असल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. या कायद्यामुळे व्यक्तीस्वातंत्र्य, विशेषतः महिलांचे स्वातंत्र्य आणि भारतीय संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्यावर परिणाम होऊ शकतो, असा आरोप संघटनांनी केला आहे.
दरम्यान, देशातील विविध राज्यांमधील धर्मांतर विरोधी कायद्यांविरोधातील याचिका सध्या सुप्रीम कोर्टात मध्ये प्रलंबित असताना महाराष्ट्र सरकारने हे विधेयक पुढे आणणे योग्य नसल्याचेही कार्यकर्त्यांनी नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर ३० पेक्षा अधिक नागरी संघटना आणि नागरिकांनी एकत्र येत ही पत्रकार परिषद आयोजित केली असून, विधेयकाचा मसुदा सार्वजनिक करावा, व्यापक चर्चा घडवून आणावी आणि योग्य संसदीय प्रक्रिया पाळावी, अशी मागणी केली जाणार आहे.
या पत्रकार परिषदेत पीयुसीएल , सीजेपि , असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिवील राईट्स, द बॉम्बे कॅथलीक सभा, मजलीस, स्त्री मुक्ती संघटना, मुस्लिम सत्यशोधक मंडल, यांसह अनेक सामाजिक संघटनांचा सहभाग असणार आहे.
पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींनी या पत्रकार परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Share

One thought on “‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विरोधात पत्रकार परिषद ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *