गरिब, कष्टकरी धारावीकरांबद्दलचा भाजपाचा द्वेष व घृणा पुन्हा उघड – प्रा. वर्षाताई गायकवाड
भेदभाव हा भाजपचा डीएनए, पियुष गोयल नंतर मिहिर कोटेच्यांकडून गरिब झोपडपट्टीवासींचा अपमान.

धारावीकरांना मोदानीच काय कोणीही हलवू शकणार नाही, धारावीकर धारावीतच राहणार.
मुंबईत लाखो गरिब, कष्टकरी लोक झोपडपट्टीत राहतात, या लोकांच्या मेहनतीवर मुंबई उभी राहली व नावारुपाला आली आहे. परंतु भाजपला गरिब लोकांबद्दल प्रचंड चिड आहे, भाजपा या गरिब, कष्टकरी झोपडपट्टीतील लोकांचा द्वेष करते. या द्वेषभावनेतूनच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यानंतर ईशान्य मुंबईचे भाजपा उमेदवार मिहीर कोटेचा यांनी झोपडपट्टीवासियांचा अपमान केला आहे. मिहीर कोटेच्या यांच्या विधानातून गरिब, कष्टकरी धारावीकरांबद्दलचा भाजपाचा द्वेष व घृणा पुन्हा उघड झाली आहे, असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष व धारावीच्या आमदार प्रा.वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
भाजपा उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या विधानाचा समाचार घेत प्रा. वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, धर्म, भाषा, पेहराव आणि आर्थिक स्थितीच्या नावाखाली भाजप समाजात फूट पाडत असते. धारावीतील चाळीस हजार लोकांचे मुलुंडमध्ये पुनर्वसन केल्याने या भागातील शांतता भंग होईल असे विधान करून कोटेचा यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. धारावीतील कष्टकरी लोक शांतता बिघडवतील, हा आरोप मनुवादी भाजपाच्या सडक्या डोक्यातूनच येऊ शकतो. याआधी मोदी सरकारमधील मंत्री आणि मुंबई उत्तर लोकसभेचे भाजपा उमेदवार पीयूष गोयल यांनी मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना मिठागरांच्या जमिनींवर स्थलांतरित करणार अशी भूमिका मांडली होती. गुजरातमध्ये दुसऱ्या देशाचे प्रमुख नेते आल्यानंतर गरिबी दिसू नये म्हणून पडदे लावून ती लपवण्याचा प्रकार याच हिन प्रवृत्तीच्या लोकांनी केला होता.
भारतीय जनता पक्षाने कितीही प्रयत्न केले तरी एकाही धारावीकराला धारावीतून विस्थापित होऊ देणार नाही. सर्व धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे आणि तेही मोठ्या आकाराच्या घरांमध्ये यावर धारावीकर जनता ठाम आहे. भाजपाला सत्तेचा माज आहे, अहंकार आहे. आपण सत्तेच्या जोरावर काहीही करु शकतो असे त्यांना वाटत असेल तर ते होणे शक्य नाही. भाजपाचा हा सत्तेचा माज ही गरिब जनताच उतरवेल. लोकसभा निवडणुकीत गरिब व गरिबीची थट्टा उडवणाऱ्या भाजपा उमेदवारांचा पराभव करुन त्यांना त्यांची जागा दाखवा, असेही वर्षाताई म्हणाल्या.