

एसएमएस – प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई : मराठी भाषेच्या प्रश्नावर गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लढा देत असताना मराठी शाळा वाचविण्यासाठी झालेल्या आंदोलनात स्वतःला मराठीचा कैवारी म्हणवणारे राजकीय पक्ष प्रत्यक्ष मैदानात उतरलेले दिसले नाहीत, असा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेड व संयुक्त महाराष्ट्र आघाडीने केला आहे.
मराठी एकीकरण समिती व मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून मराठीच्या प्रश्नासाठी सातत्याने संघर्ष सुरू असल्याचे नमूद करताना, मराठीच्या मुद्द्यावर मोठे झालेले आणि अनेक वर्षे मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असलेले पक्ष अपयशी ठरल्याचा आरोपही करण्यात आला. कधीकाळी मुंबईत ९८ टक्के असलेला मराठी समाज आज केवळ ३४ टक्क्यांवर आला असून, या परिस्थितीस जबाबदार कोण, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
मराठी माणसाच्या प्रश्नांसाठी पालिकेच्या सभागृहात ठामपणे आवाज उठवणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक मागे ठेवण्यात येत असल्याचा आरोप करत, अनेक निष्ठावंत व सक्षम महिला पदाधिकारी फक्त घोषणा देण्यापुरत्याच मर्यादित ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले. गावखेड्यांतील ‘नवरा सरपंच’ संकल्पना शहरात पुन्हा रुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा सवालही यावेळी करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर तळागाळातील समस्यांसाठी स्वतः रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या, सत्तेशी थेट दोन हात करणाऱ्या आणि जनतेतून उभ्या राहिलेल्या पूनम प्रमोद शिंदे ह्याच प्रभाग क्रमांक १४ मधील जनतेला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकतात, असा ठाम विश्वास संभाजी ब्रिगेड व संयुक्त महाराष्ट्र आघाडीने व्यक्त केला आहे.
All the best
Good