प्रदीप लक्ष्मण खरात प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त….

Share

प्रतिनिधी:वैशाली महाडिक

मुंबई महानगरपालिका सचिव खात्यात कार्यरत असलेले प्रदीप लक्ष्मण खरात हे त्यांच्या 36 वर्ष 5महिने एवढ्या प्रदीर्घ सेवेनंतर दि. 31 मे रोजी कार्यालयीन वेळेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांना निरोप देण्याकरिता महानगरपालिका सचिव संगीता शर्मा आणि इतर सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते. या शिवाय कामगार नेते व दि म्युनिसिपल युनियन या कामगार संघटनेचे सरचिटणीस श्री रमाकांत बने हे देखील प्रदीप खरात यांना शुभेच्छा देण्याकरिता जातीने उपस्थित होते.
खरात यांनी कार्यालयात फार वरिष्ठ पदावर झेप घेतलेली नसली तरी त्यांची खरी ओळख सर्व प्रकारच्या कामांची इत्यंभूत माहिती असलेला व जबाबदारी पूर्वक काम करणारा कर्मचारी आणि बहुआयामी धडाडीचा कार्यकर्ता अशीच राहिली आहे. याशिवाय कामगार कर्मचाऱ्यांमध्ये व सामाजिक क्षेत्रातही त्यांनी त्यांचा ठसा उमटवला होता. कामगार नेते स्व. शरद राव साहेब यांच्या तालमीत तयार झालेले खरात यांचे पालिकेतील इतर कामगार संघटना, नेते व पदाधिकारी यांच्याशी देखील सलोख्याचे संबंध होते. ते मुख्यालयात कार्यरत असल्याने त्यांची या सर्व संघटनांना मोलाची मदत होत असे. यामुळे खरात यांची कार्यालयात खूप चांगली प्रतिमा होती.

चिटणीस खात्यात काम करीत असताना कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक असलेल्या अनेक गोष्टी त्यांनी समोर आणल्या आणि त्यात सुधारणा करण्याकरिता त्यांनी कसोशीने सातत्यपूर्वक प्रयत्न केले व त्यासाठी ते शेवटपर्यंत झटले. कायद्यानुसार कामाची वेळ आठ तासांची असताना आणि तद्नंतर केलेल्या कामाकरिता नियमानुसार ओव्हरटाईम देण्याची तरतूद असतानाही या खात्यातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पूर्वापार गेल्या अनेक दशकांपासून कार्यालयीन वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत केलेल्या कामाचा मोबदला मिळत नव्हता. तसेच आठ तासांऐवजी चुकीचे अधिक दोन तास लादले गेले होते. सदर बाब खरात यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी इतर सहकाऱ्यांच्या सोबतीने खातेप्रमुखांकडे या मुद्द्याचा कसोशीने व सातत्यपूर्ण पाठपुरावा करून अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर कायद्यानुसार आठ तासांची कार्यालयीन वेळ व तद्नंतर केलेल्या कामाकरिता ओव्हरटाईम मिळण्याचा हक्क मिळवून अनेक दशकांपासून होणाऱ्या अन्यायापासून सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कायमची मुक्तता केली. विशेष म्हणजे कोणत्याही कामगार संघटनेमार्फत आंदोलन कोर्ट-कचेऱ्या किंवा प्रशासनाशी संघर्ष व अडवणूक न करता केवळ निवेदने व चर्चा या माध्यमातून खातेप्रमुख, सत्ताधारी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला विश्वासात घेऊन अनेक दशकांपासून होणारा अन्याय दूर करण्याचे काम महापालिकेच्या इतिहासात एकमेव व प्रथमच झाले असावे. या सगळ्याचा लाभ खरात त्यांना स्वतःला कधीच मिळाला नसला तरी, त्यांच्या वाट्याला अनेकदा फक्त कटुताच आली. परंतु यामुळे न खचता न डगमगता व कधीच वैयक्तिक हिताचा विचार न करता त्यांनी सार्वजनिक हिताचे हे काम सुरूच ठेवले.
तसेच खरात यांनी महानगरपालिकेच्या इतर खात्यातील सहकाऱ्यांच्या सोबतीने सर्व कामगार कर्मचाऱ्यांच्या हिताकरिता पालिका बाजार या कर्मचाऱ्यांच्या ग्राहक संस्थेची स्थापना केली होती. परंतु प्रशासनाच्या अनास्थेमुळे ही योजना त्यांच्या टीमला पूर्णत्वास नेता आली नाही. याशिवाय 169-सायन कोळीवाडा आणि 152-बोरीवली या दोन्ही विधानसभा क्षेत्रात मागील काळात झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीकरिता खरात यांनी त्यांच्या पदापेक्षाही किती तरी वरच्या पदाचे व विशेष जबाबदारीचे काम यशस्वीरित्या पूर्ण करून तिथल्या तहसीलदार व उपजिल्हाधिकारी या निवडणूक अधिकाऱ्यांची विशेष शाबासकी मिळवली होती. तसेच याशिवाय प्रदीप खरात हे राष्ट्र सेवा दल, मातृ मंदिर-देवरुख, वात्सल्या मंदिर-ओणी, युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया, शिक्षण संस्था व पतसंस्था या व अशा समविचारी संस्था संघटनांसोबत कार्यरत होते. तसेच विविध सामाजिक आंदोलनांतही त्यांचा सक्रिय सहभाग असे. 92-93 च्या दंगलीच्या काळात मालाड-मालवणी सारख्या विभागात सामाजिक सलोखा राखण्याकरिता आणि लोकांना विविध प्रकारे मदत करावी यासाठी इतर सहकार्‍यांसह जीवाची जोखीम पत्करून ते स्वतः अहोरात्र ठाम पणे कार्यरत होते. पर्यटन व ट्रेकिंग याची विशेष आवड असल्याने यूथ होस्टेल या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकदा राष्ट्रीय कार्यक्रमांतून मुंबई व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व आणि कॅम्प लिडरशिपही केलेली आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे त्यांना “अनुराग समाजरत्न” या राज्यस्तरीय पुरस्काराने आणि मुंबई महानगरपालिका क्रीडा भवन यांस कडून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. परंतु अविरत नि:स्वार्थपणे काम करणाऱ्या या अवलियाला मात्र कार्यालयात कधीच स्वतःची प्रगती व हित साधता आले नाही. अशी हळहळ व्यक्त करणारी चर्चा दिवसभर कार्यालयात होती.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *