
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई : चारकोप सह्याद्रीनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालयात संविधान दिन विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात आणि अनोख्या उपक्रमांनी जल्लोषात साजरा करण्यात आला. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेला *संविधान सेल्फी पॉइंट* विशेष आकर्षण ठरला
कार्यक्रमाच्या सुरुवातीस कुमारी आरोही धुमाळ हिने भारतीय संविधान निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महत्वाची भूमिका प्रभावीपणे स्पष्ट करून केली. यानंतर शिक्षिका सौ. सुविधा पाटील यांनी संविधानाचे महत्त्व, जबाबदार आणि जागरूक नागरिकांची कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना संविधान अंगीकारण्याचे आवाहन केले.दक्ष दबडे याने आपल्या सुमधुर आवाजात संविधानावर कविता सादर केली.
सातवीच्या विद्यार्थिनींनी सर्व विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रस्ताविकेची शपथ देत एकात्मता, स्वातंत्र्य आणि समानतेच्या मूल्यांची जाणीव करून दिली. त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी मानवी साखळी तयार करून राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. ‘जय हिंद’ या मानवरचनेतून साकारलेल्या आकर्षक घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाची स्मृती जपण्यासाठी सर्व विद्यार्थी गटांनी संविधान सेल्फी पॉईंटवर उत्साहात सेल्फी घेतल्या आणि हा प्रेरणादायी क्षण कॅमेऱ्यात कायमस्वरूपी बंदिस्त केला.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.शिल्पा जरे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.
विद्यालयातील हा उपक्रम संविधान दिनाचे महत्व अधोरेखित करणारा आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवण करणारा ठरला

Very good
Good
Great
Very nice