
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई :कांदिवली सह्याद्री नगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालयात आज ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर आणि घोषणांच्या निनादात प्रभातफेरी काढून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शाळेचे स्कूल कमिटी सदस्य श्री. मदन चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यानंतर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. उमाकांत जगताप यांनी ध्वजनिष्ठा प्रतिज्ञा व साक्षरतेची शपथ दिली, तर कु. सरिता जांभळे हिने संविधानाच्या उद्देशिकेचे भावपूर्ण वाचन केले.
या सोहळ्यासाठी नवनिर्वाचित नगरसेवक श्री. दीपक तावडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थी व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष शोभा लाभली.
कार्यक्रमात प्राथमिक विभागाचेदेशभक्तीपर गीतांचे सामूहिक गायन,पूर्वप्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीतावर सादर केलेले समूहनृत्य यांनी लक्ष वेधून घेतले. माध्यमिक विभागाने श्री धनाजी गळवेसर यांच्या संकल्पनेतून सामूहिक संगीत कवायत , RSP पथकाचे शिस्तबद्ध संचलनातून उपस्थितांची दाद मिळवली. पथकाने सादर केलेले लेझीम अत्यंत आकर्षक, बहारदार व नेत्रदीपक होते. तसेच मल्लखांब प्रात्यक्षिकांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली.
मुख्याध्यापिका सौ. शिल्पा जरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. त्यानंतर पूर्वप्राथमिक ते माध्यमिक विभागातील एकूण आठ विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून प्रभावी भाषणे सादर करून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद केले.
या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, पालकवर्ग तसेच शाळेचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रबळकर एन. एस. यांनी नेटकेपणाने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व विभागांचे शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी विशेष परिश्रम घेतले. एकूणच हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा देशप्रेम, एकता व शिस्त यांचा संदेश देणारा ठरला.

Good
Nice