प्रतिनिधी :मिलन शहा
फुले चित्रपट प्रत्येक शाळेत, प्रत्येक महाविद्यालयात, प्रत्येक चित्रपटगृहात आणि प्रत्येक गावात दाखवावा. चित्रपट राज्यात करमुक्त करा
मुंबई, दि. 26 एप्रिल
‘फुले’ हा चित्रपट क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन, संघर्ष आणि विचारांवर आधारित प्रेरणादायी कलाकृती आहे. फुले दाम्पत्याने महिला व वंचित घटकाला शिक्षणाचे दरवाजे उघडले त्यासाठी त्यांना किती मोठा संघर्ष करावा लागला. त्यांच्या संघर्ष आजच्या पिढीला समजला पाहिजे आणि ते फुले चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याची संधी आहे. म्हणून ‘फुले’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करून राज्यातील शाळांमध्ये, विशेषतः मुलींच्या शाळांमध्ये, या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करावे, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात खासदार वर्षा गायकवाड म्हणतात की, महात्मा फुले आणि सावित्रीमाई यांनी अत्यंत कठीण काळात शिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायासाठी संघर्ष करून समाजाला नवी दिशा दाखवली. मुली, दलित आणि उपेक्षित समाजासाठी त्यांना शिक्षणाची दारे उघडली. त्यांनी महिलांना केवळ शिक्षितच केले नाही तर त्यांना आत्मसन्मान, स्वाभिमान आणि स्वराज्याची जाणीव करून दिली. मी व माझ्यासारख्या अनेक महिलांना शिक्षण घेण्याची व राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली त्याचे सर्व श्रेय महात्मा जोतीबा फुले व सावित्रिमाई यांना जाते, त्यांनी समाजातील वंचित घटकाला शिक्षित करण्याचा वसा घेऊ शतकानुशतके जे बेड्यांचे ओझे होते त्यातून त्यांची मुक्तता केली.
आज महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत ते फुले दाम्पत्यामुळे शक्य झाले असून त्यांच्याप्रती आपलेही काही सामाजिक दायित्व आहे. म्हणून हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा यासाठी तो करमुक्त करावा, असे खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.