प्रतिनिधी:मिलन शाह
बार आणि वाईन शॉप ची नावे आता गड किल्ले, महान व्यक्तींच्या नावे लिहता अथवा फलकावर छापता येणार नाही।
मराठी अक्षरांचा टंक आकार हा इतर भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान नको
नामफलकांवर 31 मे 2022 पूर्वी सुधारणा करणे आवश्यक
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरी व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारित अधिनियम, 2022 दिनांक 17-3-2022 कलम 36 क(1) व (2) नुसार “सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक असेल आणि मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार, इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशी आस्थापना, नामफलकावर महान व्यक्तिंची किंवा गड किल्ल्यांची नावे लिहिणार नाहीत”, अशी तरतूद सदर अधिनियमात करण्यात आली आहे.
वरील अन्वये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना या खात्याद्वारे संबंधित कार्यपद्धतींचा अवलंब करण्याबाबत नुकतेच एक परिपत्रक जारी करण्यात आले असून, त्यातील ठळक मुद्दे .
1. दुकाने व आस्थापनांच्या मालकांना कलम 36 क (1) व (2) नुसार “कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेचा किंवा ज्या आस्थापनेला कलम ७ लागू आहे, त्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक, देवनागरी लिपितील मराठी भाषेमध्ये सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक असेल आणि मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार, इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशी आस्थापना, नामफलकावर महान व्यक्तिंची किंवा गड किल्ल्यांची नावे लिहिणार नाहीत.” अशा पद्धतीने ‘नामफलक’ प्रदर्शित करण्यात यावे.
2. बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व आस्थापनांना वरीलप्रमाणे अधिसुचनेनुसार नामफलकात आवश्यक तो बदल करण्यासाठी दिनांक 31 मे 2022 पर्यंत कालावधी देण्यात येत आहे.
3.ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड किल्ल्यांची नावे असल्यास वरीलप्रमाणे अधिसुचनेनुसार नामफलकात आवश्यक तो बदल करण्यासाठी शासन निर्णय क्र. बीपीए 1117/प्र.क्र.249/राउशु-2 दि.07-4-2022 नुसार दि.30-6-2022 पर्यंत कालावधी देण्यात आलेला आहे.
..
4. ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते व अशा आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड किल्ल्यांची नावे नाहीत. परंतु, वरील 1 मधील अधिसुचनेत नमुद केल्याप्रमाणे इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी दिनांक 31 मे 2022 पर्यंत कालावधी देण्यात आला आहे.
..
5. सर्व विभागीय सहाय्यक आयुक्त यांनी वरील 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे नामफलक लावण्याबाबत विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तसेच गर्दीच्या ठिकाणी नामफलकाच्या दृष्टीने जनजागृती होण्यासाठी फलक लावावेत व त्याचा अहवाल प्रमुख अधिकारी, दुकाने व आस्थापना यांना सादर करावा, असे सर्व विभागीय सहाय्यक आयुक्तांना निर्देशित करण्यात आले आहे.