
एसएमसमाचार
विस्थापित झालेल्या मालवणीतील 250 कुटुंबाचा सवाल
मुंबई,बुधवारी, ता.19जुलै ला मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असताना, मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी तसेच पोलीसांचा मोठा फौज फाटा व पाच बुलडोझर घेऊन अंबोजवाडी , मालवणी, मालाड परिसरातील झोपडपट्टीतील घरे पाडण्यात व्यस्त होते. या कारवाईत जवळपास २०० कुटुंबाने आपल्या डोक्यावरचे छत्र गमावले आहे. या अमानवीय कारवाईविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार या कुटुबांनी व्यक्त केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत सर्व प्रकारच्या तोडक कारवाई वर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही जिल्हा प्रशासनाने या कालावधीत तीन वेळा हीच वस्ती उद्ध्वस्त केल्याचा आरोप विस्थापीत झालेल्या राहिवाशांनी लावला आहे.
या वस्तीत मोठ्या प्रमाणात घरकाम करणाऱ्या महिला, फेरीवाले, रोजंदारीवर काम करणारे दलित, आदिवासी, आणि मजूर राहतात. यातील बहुतांश उत्तर प्रदेश, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड या राज्यातून आले आहेत.बहुतांश लोकांचे हातावर पोट आहे.यापुर्वी 1 आणि 6 जून तसेच 19 जुलैला अंबोजवाडी झोपड्यावर कारवाई करण्यात आली. 16 जून ला जिल्हाधिकारी कार्यालया कडून 6 जून तारीख असलेल्या नोटीस तोडलेल्या झोपड्यांवर चिटकवण्यात आल्या होत्या असा आरोपही राहीवाशानी केला.
या कारवाई नंतर पुढची दिशा ठरवण्यासाठी जन हक्क संघर्ष समिती आणि मालवणी युवा परिषद यांनी या नागरिकांसोबत बैठक घेतली. कुठलीही नोटीस न देता घरे तोडण्यात आली असून या बेकायदेशीर कृतीविरोधात वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार या कारवाईत विस्थापीत झालेल्या नागरिकांनी केला आहे. या बैठकीत आम आदमी पक्षाचे सुंदर पाडमुख, ऍड संदीप कटके तर आरपीआयचे सुनील गमरे , जन हक्क संघर्ष समितीचे कार्यकर्ते शुभम कोठारी यांच्यासह अमित गवळी, विकास वाघमारे, बैजू गुप्ता, बाळा आखाडे, शहेनशाह अन्सारी तसेच स्थानिक रहिवासी उपस्थीत होते.

मागील दहा वर्षांपासून आम्ही येथे राहत आहोत. पै पै जमा करुन आयुष्याची कमाई लावून घर उभे केले.आता भर पावसात आम्ही कुठे जायचे. आम्ही घरे बांधली तेव्हा प्रशासन झोपा काढल होते का?
हलिमा खान,राहीवाशी

गेल्या दहा बारा वर्षांपासून आम्ही येथे राहतो अचानक आमच्या घरांवर प्रशासनाने बुलडोजर फिरवले. आम्हाला आमचे सामान उचलू देण्यासाठी वेळ दिला नाही.मला तीन मुल आहेत.आम्ही जगावं की मरावं हे तरी सरकारने सांगाव
आशा खैरनार,राहीवाशी

मी व माझे कुटुंब १९९५ पासून येथे राहत आहे. भर पावसात आमच्या घरांवर बुलडोजर फिरवले. माय बाप सरकारने आमची घरे का तोडली. मुलं, मुली शाळेत शिकताहेत. आम्ही मानसिकरित्या खचलो आहे.
शोभा माने,राहीवाशी

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या बैठकीनंतर ही कारवाई केली आहे.मालाड भागातील बेकायदेशीर घरे, दुकानावर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे.नियमानुसार ही कारवाई केली आहे.
स्नेहल जोशी, उपजिल्हाधिकारी