
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
- महात्मा गांधी जयंतीनिमित्त पदयात्रा.
- मुंबई प्रदेश काँग्रेसचा पुढाकार.
मुंबई: देशभरात सध्या भाजप ‘फोडा आणि राज्य करा’ ही इंग्रजांची नीती वापरत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या विद्वेषाच्या घटना घडत आहेत, तो याच कूटनीतीचा परिपाक आहे. या घटनांचा निषेध करतानाच समाजात सद्भावनेचा विचार रूजवण्याची गरज आहे. प्रेम, सद्भावना, शांतता हा महात्मा गांधीजींचा विचार समाजमानसात पोहोचण्यासाठी I.N.D.I.A. आघाडी २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ‘मी पण गांधी’ हा नारा देत मुंबईत पदयात्रा काढणार आहे, अशी घोषणा मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केली. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या राजीव गांधी भवन कार्यालयात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत I.N.D.I.A. आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी सहभाग घेत भाजपच्या कूटनितीचा विरोध केला.
या वेळी I.N.D.I.A. आघाडीतील घटक पक्षांचे मुंबईतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यात समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार विद्या चव्हाण आणि मुंबई अध्यक्षा राखी जाधव, आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन, CPI चे प्रकाश रेड्डी, महाराष्ट्र डीएमकेचे ए. मीरन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शैलेंद्र कांबळे, शेकापच्या सम्या कोरडे, जदयुचे अध्यक्ष अमित झा, राजदचे मोहम्मद इक्बाल, आदी नेते उपस्थित होते.
मुंबईत मराठी माणसांना घर नाकारण्याचा प्रश्न असो किंवा कांदिवलीतील मराठी तरुणांना झालेली मारहाण असो, की देशभरात वाढलेल्या विद्वेषी हिंसेच्या घटना असो, या सर्वच घटनांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विद्वेषाचं राजकारण जबाबदार आहे. या घटनांचा आणि त्यामागे असलेल्या मनोवृत्तीचा निषेध आम्ही सर्वच करतो, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. तसंच त्यांनी भाजपच्या दुटप्पीपणाचाही निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात जातात, तेव्हा तथागत गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्यापुढे नतमस्तक होतात. पण देशात त्यांचे अनुयायी महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याचे गोडवे गातात. मनोहर कुलकर्णी गांधीजींवर गरळ ओकतो. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि 15 ऑगस्टचा खुलेआम अवमान करतो. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार त्याविरोधात का कारवाई करत नाही, असा सवालही आ. वर्षा गायकवाड यांनी केला.
भाजपची कब्जानीती
फोडाफोडी करून सत्ता काबीज करायची, हा भाजपचा अजेंडा आहेच. पण आता मुंबई महापालिकेसारख्या स्वायत्त संस्थांमध्येही कब्जा करण्याचं धोरण भाजपने अवलंबलं आहे. मुंबईचे पालकमंत्री आ. मंगलप्रभात लोढा यांनी महापालिकेत बेकायदा कब्जा करून कार्यालय थाटलं आहे. विधानसभेत आम्ही त्याविरोधात आवाज उठवला, मात्र आता रस्त्यावर उतरून याचा विरोध करण्यात येईल, असा इशाराही वर्षा गायकवाड यांनी दिला.
महात्मा गांधी आणि शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्त पदयात्रा गांधी विचार दडपण्याच्या प्रयत्नांना छेद देण्यासाठी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त I.N.D.I.A. आघाडीतर्फे खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई प्रदेश काँग्रेस समितीने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला असून आघाडीतील इतर घटक पक्षांची साथ त्यांना लाभली आहे. या पदयात्रेत सर्वांनीच मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहनही I.N.D.I.A. आघाडीच्या नेत्यांनी लोकांना केलं आहे.
पदयात्रेचा मार्ग खालीलप्रमाणे:
२ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता ही पदयात्रा सुरू होईल.
मेट्रो सिनेमा – फॅशन स्ट्रीट – हुतात्मा चौक – महात्मा गांधी मार्ग – बाळासाहेब ठाकरे पुतळा – रिगल सिनेमा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – राजीव गांधी पुतळा – मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांचा पुतळा, असा मार्ग असेल. महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ I.N.D.I.A. आघाडीचे नेते व कार्यकर्ते महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या स्मृतिंना वंदन करतील, अशी माहिती मुंबई प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी दिली.