
एसएमएस -प्रतिनिधी.
मुंबई :कुरार व्हिलेज परिसरात भाजपचे गुंड नेते विनोद उदयनारायण मिश्रा यांनी बसपा पक्षाच्या उमेदवाराच्या कुटुंबीयांवर व कार्यकर्त्यांवर अमानुष मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात पत्रकार राजेश हरीप्रसाद पांडे यांची २० वर्षीय मुलगी यांचिता पांडे, २० वर्षीय दृष्टी गडा, ४३ वर्षीय अनिल कडरे तसेच स्वतः राजेश पांडे जखमी झाले आहेत.
बसपा पक्षाकडून राजेश पांडे यांचा मुलगा जयेश राजेश पांडे निवडणूक लढवत असून, याच कारणामुळे भाजप नेते विनोद मिश्रा यांनी रागाच्या भरात हा हल्ला केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही मिश्रा यांनी जयेश पांडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा दावाही करण्यात आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे हा हल्ला पोलिसांच्या उपस्थितीत झाला असतानाही कुरार पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. “आमच्यावर हल्ला होत असताना पोलीस फक्त पाहत राहिले,” असा संतप्त आरोप पत्रकार राजेश पांडे यांनी केला आहे.
या घटनेनंतर पीडितांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे न्यायाची मागणी केली असून, दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची तसेच आपल्याला व कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, लोकशाही प्रक्रियेत दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.