
प्रतिनिधी :मिलन शाह
भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज:- सुरेशचंद्र राजहंस
मुंबई,काँग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून तेलंगणातून ही पदयात्रा 7 नोव्हेंबर महाराष्ट्र राज्यात प्रवेश करत आहे. भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी काँग्रेस पक्ष सज्ज असून या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन इतिहासाचे साक्षिदार व्हा, असे आवाहन काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केले आहे.
केरळपासून सुरु झालेल्या भारत जोडो यात्रेला दिवसेंदिवस मोठे जनसमर्थन मिळत आहे. दररोज हजारोंच्या संख्येने लोक पदयात्रेत सहभागी होत आहे. समाजातील सर्व घटकांचे लोक या पदयात्रेत सहभागी होत लोकशाही, संविधान व देश वाचवण्याच्या या कार्यात आपले बहुमुल्य योगदान देत आहेत. महाराष्ट्र राज्यात ही पदयात्रा ७ तारखेला देगलूर येथून प्रवेश करत असून नांदेड, हिंगोली, वाशीम, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यातून पदयात्रा मार्गक्रमण करणार आहे.382 किलोमीटरचा हा प्रवास असेल तसेच नांदेड व शेगाव येथे भव्य जाहीर सभा होणार आहेत. या जाहीर सभाही इतिहास निर्माण करणाऱ्या ठरतील.
भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी लाखो काँग्रेस कार्यकर्ते सज्ज आहेत. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यात भारत जोडो यात्रेला मिळालेला प्रतिसाद मोठा आहे. हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होत आहेत. ही राजकीय यात्रा नसून ‘भारत तोडो’च्या विरोधात ‘भारत जोडो’चा संकल्प घेऊन ही पदयात्रा निघालेली आहे. महाराष्ट्रातही या पदयात्रेचे भव्य स्वागत होईल व ‘भारत जोड़ो यात्रा’ महाराष्ट्रात नवा इतिहास घडवेल, असा विश्वास राजहंस यांनी व्यक्त केला आहे.