प्रतिनिधी : नरेंद्र भुरण
मुंबई,भारत पेट्रोलियम या सरकारी उपक्रमातील कंत्राटी कामगारांचे व्यवस्थापनाकडून शोषण होत असून अत्यल्प वेतनावर त्यांना राबवून घेण्यात येते आहे. याच्या निषेधार्थ आणि वेतन वाढीच्या मागणीसाठी या कामगारांच्या वतीने महाराष्ट्र श्रमिक सभेने व्यवस्थापनाला बेमुदत संपाची नोटीस दिली आहे.
भारत पेट्रोलियमच्या वाडीबंदर, शिवडी येथील युनिटमध्ये मिळून सहाशे हून अधिक कामगार आहेत. तीन कंत्राटदारांच्या माध्यमातून या कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील बऱ्याच कामगारांनी 12ते 15 वर्षे काम केले असून एवढ्या सेवेनंतरही अवघा 14 ते 15 हजार रुपये पगार त्यांना मिळत आहे. या कामगारांची नियुक्ती अकुशल कामगार म्हणून झाली असली तरी प्रत्यक्ष मशिन ऑपरेटिंगसह कुशल कामगारांचे काम या कामगारांना करावे लागते. मुळच्या कुशल कामगारांना याच कामाचा तिपटीहून अधिक मोबदला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर या कामगारांनी अलिकडेच महाराष्ट्र श्रमिक सभा या कामगार संघटनेचे नेतृत्व स्वीकारले होते. संघटनेचे सरचिटणीस केतन कदम यांनी ज्येष्ठ कामगार नेते सूर्यकांत बागल यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापनाला निवेदन देऊन कामगारांच्या मागण्या आणि समस्यांबाबत चर्चेची मागणी केली होती. मात्र, याला प्रतिसाद न मिळाल्याने संघटनेने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापनास 11 सप्टेंबरपासून संपावर जाण्याची नोटीस दिली आहे.
पगारवाढीबरोबरच , पीएफ, ग्रॅच्युईटी, पूर्ण महिनाभर काम, आठवड्याला भरपगारी साप्ताहिक सुट्टी, आरोग्य विमा योजनचे लाभ अशा मागण्या संघटनेच्या वतीने व्यवस्थापनाकडे करण्यात आल्या आहेत. दरम्यान,दि. 8 सप्टेंबर रोजी कामगार काळ्या फिती लावून निषेध दिन पाळणार आहेत.