
प्रतिनिधी :मिलन शहा
सरकारी रुग्णालयात उपचारासाठी केसपेपर लिहून देताना त्यात जातीचा उल्लेख बंधनकारक असल्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उघड झाला आहे. उपचार घेण्यासाठी रुग्णांची जात बंधनकारक करण्याचे खूळ कोणाच्या सुपीक डोक्यातून आले याचा शोध घ्यावा व त्यावर कडक कारवाई करून जात लिहिण्याचा प्रकार तात्काळ थांबवा अशी मागणी मातंग समाजाचे नेते व काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचे राज्य आहे, समाजातील अनिष्ठ चालीरीती, रुढी परंपरा बंद करण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी त्यांचे आयुष्य खर्ची घातले. जाती पातीला थारा असता कामा नये असा विचारही बोलून दाखवला जात असतो परंतु आधुनिक युगातही जात काही जात नाही असे प्रकार अधुनमधून पाहण्यास मिळतात. मनमाड उपरुग्णालयात जात विचारण्याचा प्रकार हा अत्यंत आक्षेपार्ह व घटनाविरोधी तसेच संतापजनक आहे. महाराष्ट्रात असा प्रकार होऊच कसा शकतो. याची राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन हा प्रकार थांबवावा व संबंधितांवर कारवाई करावी जेणेकरुन असला प्रकार पुन्हा होणार नाही.
शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी जात सांगणेही बंधन कारक केले होते. त्यावेळीही लोकांनी संताप व्यक्त केला होता पण सरकार चुकांमदून काही बोध घेत नाही असेच दिसते. कदाचित सत्तेत जातीवादी सरकार असल्याने अशा प्रकाराला खतपाणी घातले जात आहे का असा संशय येतो. पण काहीही असले तरी असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत होता काम नये याची सरकारने खबरदारी घ्यावी.
तसेच अलिकडच्या काळात अनेक ठिकाणी गरज नसताना नागरिकांना त्यांची जात विचारण्याचा घटना वाढत आहे राज्यसरकारने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन हे प्रकार थांबवावेत. समाजात जातीभेद निर्माण करण्यास प्रोत्साहन देऊ नये, असेही राजहंस म्हणाले.