एसएमएस-प्रतिनिधी-उत्कर्ष बोर्ले.
मुंबई : शिक्षण विभागातील अनियमित शालार्थ क्रमांक, वैयक्तिक मान्यता आणि बोगस शिक्षक नियुक्ती प्रकरणांतील गंभीर दुर्लक्ष आणि संशयित गैरव्यवहारांमुळे तत्कालीक विभागीय शिक्षण उपसंचालक, नाशिक (सध्या विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अमरावती) बी. बी. चव्हाण यांना शासनाने तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.
आयुक्त (शिक्षण), पुणे यांच्या अहवालानुसार —
चव्हाण यांनी शालार्थ/वैयक्तिक मान्यता प्रकरणांच्या सुनावणीत जाणूनबुजून विलंब केला,
चौकशी पथकाला आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून दिली नाहीत,
जळगाव जिल्ह्यातील अनियमित मान्यता प्रकरणांत प्रशासकीय हलगर्जीपणा केला,
तसेच नाशिकमधील अंजुमन मोईनू तुलबा शाळेत बोगस शिक्षक नियुक्ती करून शासनाची फसवणूक झालेल्या गुन्ह्यात ते सहआरोपी ठरले आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेच्या अहवालानुसार या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात भा.दं.सं.च्या विविध कलमांखाली गुन्हा नोंद असून अभियोग दाखल करण्यासाठी मंजुरीही शिफारस करण्यात आली आहे.
शासनाने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 च्या तरतुदींनुसार चव्हाण यांना निलंबित केले असून पुढील आदेशापर्यंत त्यांचे मुख्यालय अमरावती विभागीय मंडळ कार्यालयातच राहील. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.
निलंबन काळात खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करणे नियमबाह्य असून तसे केल्यास निर्वाहभत्ताही रद्द होणार आहे. मात्र नियमानुसार चव्हाण यांना निर्वाहभत्ता आणि पूरकभत्ता देण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.
Very delayed but right decision.
Good