प्रतिनिधी :मिलन शहा
बेरजेच्या राजकारणात मातंग समाज वाऱ्यावर! सुरेशचंद्र राजहंस

मुंबई,सकल मातंग समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला जाग आणण्यासाठी दवंडी यात्रा काढण्यात आली आहे. सकल मातंग समाजाच्या वतीने लहू तीर्थ पुणे ते मुंबई अशी दवंडी यात्रा निघाली असून गुरुवारी २० जुलै रोजी ही दवंडी यात्रा आझाद मैदानावर धडक देणार आहे, अशी माहिती सकल मातंग समाजाचे नेते व काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील संगमवाडी येथील क्रांतिवीर लहुजी साळवे स्मारकापासून या दवंडी यात्रेला सुरुवात झाली असून २० जुलैला ही दवंडी यात्रा आझाद मैदानावर येणार आहे.अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील सर्व जातींना आरक्षणाचा समान लाभ मिळण्यासाठी अनुसुचित जातीच्या आरक्षणात अ ब क ड वर्गीकरण करणे, बार्टी या संस्थेच्या धर्तीवर आर्टीची स्थापना करणे आणि क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू करणे व आरक्षण वर्गीकरण शहीद स्व संजय ताकतोड यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व पनर्वसन करण्यात यावे या प्रमुख मागण्या आहेत. मातंग समाजाच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने क्रांतवीर लहूजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या तत्वतः स्विकारलेल्या शिफारशींची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. मातंग समाजासाठी शिंदे फडणवीस सरकारकडे निधीच नाही.
मातंग समाज २० वर्षांपासून मातंग व इतर वंचित जातींना आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी सतत आक्रोश करीत आहेत. परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करीत आले आहे. सकल मातंग समाजाच्या वतीने २२ फेब्रुवारी २०२३ रोजी आझाद मैदान येथे जवाब दो अंदोलन करण्यात आले होते होते. याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दि. २५ मार्च २०२३ रोजी सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मागण्यांच्या अनुषंगाने १ महिन्यात माहिती घेऊन निर्णय देतो असे आश्वासन दिले होते. परंतु ४ महिने झाले तरी कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सकल मातंग समाजात प्रचंड असंतोष पसरला असल्याने सकल मातंग समाजाच्या वतीने १८ जुलै ते २० जुलै दरम्यान पुणे ते मुंबई अशी दवंडी यात्रा सुरु केली असून या दवंडी यात्रेचे 20/7/2023 रोजी आझाद मैदान येथे भव्य महामोर्चात रूपांतर होणार आहे, असे राजहंस यांनी सांगितले.