
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई : मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरात आम आदमी पार्टीने (आप) निवडणूक रणशिंग फुंकत वॉर्ड क्रमांक ३४ आणि ४८ साठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. वॉर्ड क्रमांक ४८ मधून मुख्याध्यापिका लारझी वर्गिस, तर वॉर्ड क्रमांक ३४ मधून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अब्राह्म थॉमस यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.
उमेदवारी जाहीर होताच दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून घरोघरी भेटी, चौकसभा आणि थेट संवादाच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे प्रचाराच्या मैदानात ‘आप’ने सुरुवातीपासूनच आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.
विशेष म्हणजे हे दोन्ही वॉर्ड सध्या काँग्रेसच्या ताब्यात असून, भाजप व काँग्रेसमध्ये अद्याप उमेदवारीवर एकमत न झाल्याने तसेच संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत आम आदमी पार्टीने आधीच उमेदवार जाहीर करून प्रचार सुरू केल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
‘आप’च्या या आक्रमक रणनीतीमुळे भाजप, काँग्रेस, शिवसेना तसेच इतर राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांची चांगलीच धांदल उडाली असून मालवणीतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

Very nice
Great