प्रतिनिधी :वैशाली महाडिक

शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचा नूर महेर चॅरिटेबल ट्रस्ट चा प्रयत्न कौतुकास्पद – आमदर अस्लम शेख.
मुंबई,देशाच्या प्रगतीचा मार्ग ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानातून जातो.मुंबईतील पहिला मदरसा डिजिटल करुन शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचा नूर महेर चॅरिटेबल ट्रस्टचा प्रयत्न कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत मालाडचे आमदार अस्लम शेख यांनी नूर महेर चॅरिटेबल ट्रस्ट च्या कार्याचा गौरव केला आहे. मालाड पश्चिम मालवणीतील मुंबईतील पहिल्या डिजिटल मदरशाच्या उद्घाटन प्रसंगी शेख बोलत होते.
अस्लम शेख पुढे म्हणाले की, पुर्वीच्या काळी माहितीचे स्त्रोत मर्यादित होते. मात्र गेल्या दशकभरात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये झालेल्या अभूतपूर्व क्रांतीमुळे जग जवळ आलेले आहे. कोणतीही माहिती एका क्लिकवर सहजगत्या उपलब्ध होऊ लागली आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरल्याशिवाय आजचा विद्यार्थी जागतिक स्पर्धेत तग धरुच शकत नाही.
नूर महेर चॅरिटेबल ट्रस्टने आधुनिक तंत्रज्ञानाचं महत्त्व ओळखून मुंबईतील पहिला मदरसा डिजिटल करुन विद्यार्थांना जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलले आहे.
मदरसा व शाळा डिजिटल झाल्याने ई पुस्तकालय, दूरदृष्य प्रणालीद्वारे व्याख्याने अशा विविध सुविधांचा लाभ आता विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा वृद्धींगत होण्यास मदत होईल, असही शेख शेवटी म्हणाले. यावेळी आमदार अस्लम शेख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टॅब वितरीत करण्यात आले.
ट्रस्टचे अध्यक्ष सय्यद अली हुसैन, इमाम उल हिन फाऊंडेशन चे अध्यक्ष मौलाना नौशाद अहमद सिद्दिकी, अखिल भारतीय उल्मा बोर्डचे राष्ट्रीय महासचिव अल्लामा बुनई हसनी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
