
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई,मालाड,मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेनुसार “माझी मुंबई स्वच्छ मुंबई” हा उपक्रम दिनांक 1 ते 31डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पी/उत्तर विभागात राठोडी येथील ‘कमळ तलाव’ या ठिकाणी गुरुवार दिनांक 1डिसेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता उत्तर मुंबई चे भाजप खासदार गोपाळ शेट्टी व मालाड पश्चिम चेकाँग्रेस आमदार असलम शेख तसेच पालिका पी उत्तर विभागीय सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर व माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

पी/उत्तर विभागात अस्तित्वात असलेल्या 18 तलावांपैकी 11 तलाव राज्य शासन, 2 तलाव महाडा, 2 तलाव जिल्हाधिकारी व 3 तलाव महापालिका यांच्या अखत्यारित येतात. कमळ तलाव स्वच्छ करण्याकरिता मोठ्या संख्येने स्थानिक रहिवाशी, मनपा कर्मचारी, सामाजिक व शैक्षणिक संस्था यांचा सहभाग उत्स्फूर्तपणे नोंदविण्यात आला. तसेच उपस्थिताना खासदार व आमदार यांनी स्वच्छते बाबत मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाकरिता मुंबई पब्लिक स्कूल मालवणी टाऊनशिप व मालवणी व्हिलेज या शाळेच्या विद्यार्थ्यांनी ही सहभाग घेतला. तसेच मायग्रेन सोसायटी, वंदे मातरम शिक्षण संस्था व विविध स्थानिक संस्थांनी सहभाग नोंदवला. सदर स्वच्छता कार्यक्रमाकरिता तराफे , जेसीबी व क्रेन या यंत्रांचा वापर करून तलावाची स्वच्छता करण्यास सुरुवात केली. तसेच पी/उत्तर विभागात हिरादेवी तलाव भाटीगाव व शांताराम तलाव या तलावांची देखील साफसफाई करण्यात येत आहे. अशाप्रकारे पी/उत्तर विभागातील सर्व 18 तलावांची स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.