एसएमएस-प्रतिनिधी
मुंबई :उत्तर मुंबईत काँग्रेसने आपला गड कायम राखला आहे. मालाड पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ३३, ३४, ४८ आणि ४९ मधून काँग्रेसचे चार नगरसेवक विजयी झाले. प्रभाग ३३ मधून कमरजहाँ मोईन सिद्दीकी, ३४ मधून हैदर अस्लम शेख, ४८ मधून रफिक इल्यास शेख तर ४९ मधून संगीता चंद्रकांत कोळी यांनी विजय मिळवला.
मागील २५ वर्षांत मढ परिसरातून काँग्रेसचा उमेदवार कधीही विजयी झाला नव्हता. मात्र यंदा काँग्रेसने कोळी समाजातील उमेदवार दिल्याने मढ परिसरातील कोळी समाज तसेच आंबोजवाडी–मालवणीतील मुस्लिम समाजाने ठाम पाठिंबा दिला. या सामाजिक एकजुटीमुळे संगीता कोळी यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला.
प्रभाग क्रमांक ३२ मधून माजी ठाकरे गटाच्या नगरसेविका गीता किरण भंडारी यांनी केवळ ८४ मतांच्या फरकाने विजय मिळवत आपली जागा राखली. २०१७ मध्ये त्या दुसऱ्या क्रमांकावर होत्या. मात्र ओबीसी आरक्षणासंदर्भातील तांत्रिक बाबींवर उच्च न्यायालयाने काँग्रेसच्या स्टेफी किणी यांचे नगरसेवक पद रद्द केल्याने त्यांना संधी मिळाली होती. यंदा त्यांनी शिवसेना (शिंदे गट)च्या उमेदवार मनाली अजित भंडारी यांचा पराभव केला.
दरम्यान, प्रभाग ३५ मधून भाजपचे योगेश वर्मा, ४७ मधून भाजयुवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांनी आपापले गड राखले. प्रभाग ४६ मधून भाजपच्या योगिता सुनील कोळी यांनी मोठ्या फरकाने पुनर्विजय मिळवला. प्रभाग ४८ मधून रफिक शेख यांनी दिग्गजांना पिछाडीवर टाकत प्रतिष्ठेची लढत जिंकली. तर प्रभाग ३४ मधून आमदार अस्लम शेख यांचे पुत्र हैदर अस्लम शेख यांनी सहज विजय मिळवला.
या निवडणुकीत तीन नगरसेवकांनी आपापल्या जागा कायम राखल्या, तर जनतेने पाच नव्या चेहऱ्यांना संधी दिली.
प्रभाग क्रमांक ३२ मधील अटीतटीच्या लढतीत गीता किरण भंडारी यांनी शिवसेना (शिंदे गट)चे माजी नगरसेवक अजित भंडारी यांची कन्या मनाली अजित भंडारी यांचा अवघ्या ८४ मतांनी पराभव केला.