एसएमएस-प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होऊन तब्बल १५ वर्षे उलटली, तरीही प्रकल्प पूर्णत्वास का जात नाही? भाजपा सरकार केवळ मोठमोठ्या घोषणा करते; मात्र प्रत्यक्षात प्रकल्पांना विलंब होतो आणि खर्च वाढतो, असा सवाल काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत उपस्थित केला.
मुंबईला देशातील प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमध्ये होत असलेल्या विलंबाबाबत त्यांनी केंद्र सरकारला जाब विचारला. विशेषतः दिल्ली -मुंबई एक्सप्रेस वे, मुंबई -नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी विचारले की,
वारंवार होणाऱ्या विलंबामागचे कारण काय?
वाढत्या खर्चाबाबत सरकारकडे ठोस नियोजन आहे का?
या विलंबाचा मुंबई महानगर प्रदेशातील मालवाहतूक, बंदर कनेक्टिव्हिटी आणि दैनंदिन प्रवाशांवर परिणाम झाला आहे का?
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्पांमध्ये गुणवत्ता आणि वेळेत पूर्णता सुनिश्चित करण्यासाठी कोणती सुधारात्मक पावले उचलली जात आहेत?
गडकरींचे उत्तर काय?
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर देताना सांगितले की:
मुंबई (पनवेल) ते गोवा/महाराष्ट्र सीमेपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ ची लांबी सुमारे ४८५ किमी आहे.
डिसेंबर २०११ पासून चारपदरीकरणाचे काम १२ पॅकेजेसमध्ये सुरू आहे.
त्यापैकी ४६५ किमीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित २० किमीचे काम सुरू आहे.
जून २०२६ पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
जमिनीचे संपादन, पर्यावरणीय मंजुरी, युटिलिटी स्थलांतर आणि काही कंत्राटदारांची संथ प्रगती यामुळे विलंब झाला.