
प्रतिनिधी:मिलन शाह
मुंबई, आज आपला देश अतिशय कठीण कालखंडातुन जात आहे. देशातील लोकशाही आणि संविधान दोन्हीही धोक्यात आहेत. आपल्या देशात सत्तेत असलेले मोदींच्या नेतृत्वातील भाजपचे सरकार संविधानिक मूल्य, लोकशाही मूल्य पायदळी तुडवून राज्यकारभार करत आहे. देशातील नागरिकांचे हक्क मूठभर भांडवलदारांच्या हातात सोपवू पाहत आहे. सध्याच्या काळात हुकूमशाही विचारांचे सरकार सत्तेत असल्यामुळे लोकशाही संकटात सापडली आहे. देशभक्तीची नवी व्याख्या शिकवली जात असून देशातील विविधता मान्य नसणाऱ्यांना देशभक्त ठरवले जात आहे असा आरोप काँग्रेस नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केला आहे.
देशाचा आत्मा म्हणजे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड त्यागातून व बलिदानातून देशाला दिलेलं जगातील सर्वश्रेष्ठ संविधान! त्यावर सुनियोजित पद्धतीने हल्ला केला जात आहे. धर्म,जात आणि विचारसरणीच्या आधारे आपल्याच नागरिकांमध्ये भेदभाव केला जात आहे. भाषा, प्रांत, पोशाख, विहार तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यांवर दडपशाही चालू आहे. लोकांच्या मनामध्ये भय व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले जात आहे. आपल्या देशाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवायची असेल, आपलं संविधान आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर देशातील जनता व लोकशाही व संविधान टिकले पाहिजे यासाठी लढणाऱ्या सर्वच घटकांनी रस्त्यावर उतरून मोदी सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे.
सरकारच्या विरोधात उठणारा आवाज दाबून टाकण्यासाठी ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स या सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. म्हणून देशाचे आणि लोकांचे हित लक्षात घेता देशात सत्तापरिवर्तन होणे ही काळाची गरज आहे. सत्य, न्याय आणि अहिंसा हा काँग्रेस विचारधारेचा पाया आहे. याच विचारधारेने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. या विचारधारेपुढे ब्रिटिशांना झुकावे लागले आहे. आणि काँग्रेसचा हाच विचार केंद्रातील मोदी सरकारलाही नक्कीच झुकवेल असेही राजहंस म्हणाले.