
प्रतिनिधी:वैशाली महाडिक
मुंबई,चिपळूण येथील राष्ट्र सेवा दलाचे जेष्ठ कार्यकर्ते शशिकांत तथा बापू लवेकर यांचे सोमवार दिनांक 25 जुलै रोजी मिरारोड , ठाणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
शशिकांत लवेकर हे राष्ट्र सेवा दल तसेच समाजवादी विचारांच्या चळवळीला अखंड वाहुन घेतलेले कार्यकर्ते होते. प्रारंभी प्रजा समाजवादी पक्ष तसेच त्यानंतर जनता पक्ष आणि जनता दलाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील कामाची धुरा देखिल त्यांनी अत्यंत निष्ठेने सांभाळली. माणगाव येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीत त्यांचे खूप मोठे योगदान होते. स्मारकाचा स्थापनेच्या काळात ते स्मारकाचे विश्वस्त होते. याशिवाय डॉ. बाबा आढाव प्रणित हमाल पंचायतच्या रत्नागिरी जिल्ह्यातील कामात देखिल त्यांचे योगदान होते.
व्यवसायाने मूर्तिकार असलेले शशीकांत लवेकर चिपळूण मध्ये समाजवादी विचारसरणीला वाहून घेतलेले तसेच सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आयुष्यभर सतत झटणारे कार्यकर्ते म्हणुन प्रसिद्ध होते.

चिपळूणच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांची प्रतिमा नेहमीच उठून दिसत असे. साने गुरुजी, जयप्रकाश नारायण, नाथ पै, एस.एम.जोशी, मधु दंडवते यांच्या विचारांचे ते अनुयायी होते. त्यांनी कधीच कोणत्याही पदाची अभिलाषा बाळगली नाही. त्यांचा लोक सम्पर्क अतिशय दांडगा होता. कायम चळवळी, आंदोलन, सेवादलाच्या कामात सतत व्यस्त असणाऱ्या या कार्यकर्त्याच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्वच स्तरावर हळहळ व्यक्त होत आहे.
शुक्रवार दिनांक 29 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता चिपळूण येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात त्यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले असून, या सभेला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष रमाकांत सकपाळ यांनी केले आहे.

