लेखक :शरद कदम,
क्या करते हो, टाईम है क्या?आज भेटायला येशील का ? अशी सकाळी विचारणा करणारा ' जी.जी.' यांचा फोन आता येणार नाही. डॉ.जी.जी. परिख यांना मी पहिल्यांदा कधी भेटलो ते आठवत नाही. कदाचित 9 ऑगस्टच्या गिरगाव येथील टिळकांच्या पुतळ्यापासून ते ऑगस्ट क्रांती मैदाना पर्यंत चालताना किंवा 'तारा ' इथल्या सेंटर मध्ये? नेमकं आठवत नाही.महात्मा गांधीना न पाहिलेली माझी पिढी. गांधी भेटले पुस्तकातून, व्याख्यानातून आणि त्यांच्या सत्याग्रहातून पण, डॉ. जी. जी. यांच्या मध्ये माझ्या पिढीला गांधी पाहता आले. आता तर महात्मा गांधी यांच्या रक्ताच्या वारसा सोबत म्हणजे तुषार गांधी यांच्या सोबत काम करतो आहे. गांधीचा वैचारिक वारसा सांभाळणारे जी. जी. आणि गांधींची विरासत असलेले तुषार भाई या दोघांना पाहता आले. सोबत काम करता आले.
गांधीचा विचार प्रत्यक्ष कृतीत पाहायचा असेल तर त्यासाठी जी.जी.यांच्याकडे पाहणे पुरेसे होते.महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाच्या आणि लोकशाही समाजवादाच्या तत्वांना आयुष्यभर जगलेले व्यक्तिमत्व आता आपल्यात नाही.101 वर्षाच्या दीर्घ प्रवासानंतर गांधी जयंतीच्या दिवशीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला हा केवळ योगायोग नाही तर त्यांच्या जीवनाची साक्ष देणारी घटना आहे.
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा असं संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सांगून गेले. तुकोबारायांचा हा तत्व विचार जी.जी.नी आपल्या प्रत्येक कृतीतून साकार केला.रूढ अर्थाने ते वारकरी परंपरेतील नसतीलही पण वारकरी परंपरेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यात शेवटपर्यंत आचरणात आणली.
1942 च्या स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी त्यांच्या तरुणपणात महात्मा गांधीना पाहिले. गवालिया टँक येथल्या आंदोलनात त्यांना उपस्थित राहता आले तेव्हा जी.जी. कॉलेज विद्यार्थी होते. गांधीच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. लोकशाही समाजवादी समाजरचनेसाठी आचार्य नरेंद्र देव,डॉ. राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण,युसूफ मेहेरअली , प्रा.मधू दंडवते,यांच्या सोबत समाजवादी चळवळीत सक्रिय भूमिका निभावली. ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीला ‘ भारत छोडो ‘ हा मंत्र दिला. 1942 च्या’ चलेजाव ‘ या आंदोलनाने ब्रिटिशांना शेवटचा धक्का दिला. त्या शब्दाचे जनक, स्वतंत्र भारतातील मुंबईचे महापौर युसूफ मेहेरअली यांच्या नावाने संस्था काढून गरीब, शेतकरी, शेतमजूर, कामगार, शोषित यांच्यासाठी ‘ तारा ‘ येथे 1962 पासून काम सुरू केले. तारा हे ठिकाण मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्याच्या थोडं पुढे आहे. युसूफ मेहर अली सेंटर चा विस्तार आता देशातील बारा ते पंधरा राज्यात झाला आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या जी. जी. यांनी आपली डॉक्टरी व्यावसायिक यशापेक्षा मानवी सेवेसाठी केली.आपले सगळं वैद्यकीय कसब गांधींनी सांगितलेल्या शेवटच्या माणसा साठी वापरले.
सानेगुरुजी यांनी जे नवभारताचे स्वप्न पाहिले ते स्वप्न जी. जी. जगले. जी. जी. सत्तावादी नव्हते तर ते पक्के कृतिशील समाजवादी होते. जनता पक्षाचे सरकार आल्यावर सोबतचे सगळे मित्र आमदार, खासदार, मंत्री झाले. राज्यसभेवर किंवा एकाद्या राज्याचे राज्यपाल होण्याची संधी असतानाही त्यांनी त्याकडे पाठ फिरवली आणि समाजवादी समाजरचनेसाठी अख्खं आयुष्य म्हणजे वयाची 101 वर्ष स्वतःला झोकून दिलं.
जी. जी. गेले तो दिवस होता. गांधी जयंतीचा. इतकी वर्ष त्यांच्या सोबत राहूनही त्यांच्या अंतिम क्षणी उपस्थित राहता आले नाही ही खंत शेवटपर्यंत राहील.त्या दिवशी आम्ही सगळे वर्ध्याच्या बापूंच्या आश्रमात होतो. तुषार गांधी यांच्या सोबत दीक्षाभूमी ते सेवाग्राम या 90 किलोमीटरच्या पदयात्रेत चालत होतो. त्यांनी जिला मुलीसारखी वागवले ती गुड्डी ही त्या दिवशी त्यांच्या शेवटच्या क्षणी सोबत नव्हती. शंभरीतील जी. जी. माझ्या सारख्या वयाच्या किंबहुना एकदम तरुण मुलांशी चटकन कसे कनेक्ट होतात हा मला कायम पडलेला प्रश्न असे. त्यांची साधी राहणी, मृदु वाणी आणि प्रत्येकाशी संवाद साधण्याची सहज शैली यामुळे ते प्रत्येक पिढीशी जोडले गेले.आपल्याला कालचे काही आठवत नाही पण जी.जी. यांनी एखादे काम वर्षापूर्वी सांगितले असेल तरीही त्यांच्या डोक्यात त्याची पक्की आठवण असे. एकदम sharp memory “तुमको जो बोला था ऊस काम क्या हुंवा” अस सतत आठवण करून देणारे जी. जी. आज आपल्या सोबत नाहीत. जी.जी. व्यक्ती म्हणून नाही तर कायम समूह म्हणून जगत आले. सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी वाटचाल केली. जी. जी. परीख यांच्या श्रद्धांजली सभेत बसलो असताना हे सारं आठवतं होतं. गांधी, लोहिया, सानेगुरुजी यांचा वैचारिक वारसा जोडणारा एक दृढ दुवा तुटला आहे.ज्यांच्याशी संवाद करता येत होता असा लोकशाही समाजवादी मार्गदर्शक आपल्यातून निघून गेला.
डॉ.जी. जी. परिख यांना विनम्र अभिवादन.
विनम्र अभिवादन