वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडेला सेवेतून बडतर्फ करा काँग्रेस ची मागणी…

Share

प्रतिनिधी :मिलन शहा


मुंबई,नार्कोटीक कंट्रोल ब्युरोचे तत्कालीन विभाग संचालक समीर वानखेडे यांनी महाराष्ट्रात उच्छाद मांडला होता. सेलिब्रिटींवर अमली पदार्थ्यांच्या सेवनाचे आरोप करुन वानखेडे यांनी त्यांना ब्लॅकमेल केले. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही अंमली पदार्थांच्या प्रकरणात खोटे गुन्हे दाखल करुन अडकवण्यात आल्याचे उघड झाले असून या प्रकरणातील एनसीबीचे अधीक्षक विश्वविजय सिंग यांना बडतर्फ करण्यात आले आहे परंतु या कारवाईचे नेतृत्व करणारे समीर वानखेडेवर अद्याप कारवाई झालेली नाही, समीर वानखेडेचे ‘उद्योग’ पाहता त्यांनाही सेवेतून बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडेने शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आला होता तेच सीबीआयच्या आरोपपत्रात म्हटले आहे. सीबीआयने वानखेडे यांना चौकशीचे समन्स बजावले आहे परंतु सीबीआयने केवळ चौकशी करुन वानखेडेला सोडू नये. समीर वानखेडे याने अधिकाराचा गैरवापर केल्याचे आरोप त्यांच्यावर झालेले आहेत. कॉर्डिलिया क्रूझवर रेड टाकणाऱ्या पथकाचे नेतृत्व समीर वानखेडे यानेच केले होते. शाहरुख खानचा मुलगा आर्यनला नियोजनपूर्वक अडकवण्यात आल्याचे नंतर स्पष्ट झाले. न्यायालयानेही जामीनावर सुटका करताना एनसीबीच्या कारवाईवर ताशेरे ओढले होते. मनमानी कारभार करणाऱ्या वानखेडेने बॉलिवूडमधील अनेकांना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळल्याचे गंभीर आरोपही आहेत. आर्यन खानला अटक करणाऱ्या नार्कोटीक कंट्रोल ब्युरोचा अधीक्षक विश्वविजय सिंग यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ही कारवाई एनसीबीचे तत्कालीन विभाग संचालक समीर वानखेडे यांचे नेतृत्वाखाली झाली होती. विश्वविजय सिंग यांना बडतर्फ केले आहे तर मग वानखेडेवर बडतर्फीची कारवाई का होत नाही. समीर वानखेडे यांच्यावर बनावट जातीचा दाखला प्रकरणीही अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. समीर वानखेडे यांच्यासाठी कायदा वेगळा नाही यांच्यावरही कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *