विलेपार्लेत धुळी मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -कृष्णा वाघमारे

मुंबई : विलेपार्ले पूर्व येथील प्रभाग क्रमांक ८४ मधील शहाजी राजे भोसले मार्गावर सध्या एकाच वेळी सुमारे १० मोठ्या बांधकाम व पुनर्विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या सर्व कामांमुळे परिसरात प्रचंड प्रमाणात धूळ व माती उडत असून संपूर्ण विलेपार्ले परिसर धुळीच्या ढगात गुरफटल्याचे चित्र आहे. परिणामी स्थानिक रहिवाशांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे.

सतत उडणाऱ्या धुळीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दमा, अ‍ॅलर्जी व श्वसनविकारांनी त्रस्त रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. अनेक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ, खोकला व ताप अशा तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. काही नागरिकांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले, तर अनेक जण घरच्या घरी उपचार घेण्यास भाग पडले आहेत.

बांधकाम स्थळांवर आवश्यक ती धूळ नियंत्रणाची उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पाण्याचा नियमित शिडकावा, संरक्षणात्मक जाळ्या (ग्रीन नेट), तसेच मलबा झाकून वाहतूक करणे यासारख्या मूलभूत उपायांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. यामुळे परिसरातील रस्ते, घरे, दुकाने तसेच वाहनांवर धुळीचा थर साचत असून स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

स्थानिक नागरिकांनी याबाबत महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी केली आहे. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी केवळ आश्वासने न देता या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, ठोस उपाययोजना राबवाव्यात आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.-उत्कर्ष बोर्ले-स्थानिक रहिवासी.


Share

2 thoughts on “विलेपार्लेत धुळी मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात..

  1. या सर्व विकासकाना आणि विकासात खुप मोठया लोकाचा हात आहे किती ही आरडा ओरडा करुन काहीही होणार नाही आणि या सर्वाना जबाबदार जनताच आहे आपण ताकद दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *