एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक.
मुंबई : शिक्षणक्षेत्रातील मूल्याधिष्ठित लढ्याचे ज्येष्ठ नेतृत्व, उच्च शिक्षणाचे अध्वर्यू आणि प्राध्यापकांच्या संघटनात्मक चळवळीचे मार्गदर्शक कॉम्रेड प्रा. किशोर ठेकेदत्त यांचे दि. २० डिसेंबर २०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशातील शिक्षणक्षेत्राने एक अभ्यासू आणि संघर्षशील नेतृत्व गमावले आहे.
गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रा. ठेकेदत्त यांनी उच्च शिक्षण क्षेत्रात सक्रिय योगदान दिले. प्राध्यापक, शाळा शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालये तसेच विद्यापीठीन शिक्षणाशी संबंधित विविध प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले. शिक्षणातील गुणवत्ता, विद्यार्थीहिताचे नियम आणि शिक्षणाच्या वाढत्या बाजारीकरणाविरोधात त्यांनी ठाम भूमिका घेतली. शिक्षण हे सार्वजनिक हिताचे माध्यम असावे, हा विचार त्यांच्या संपूर्ण कार्यकाळाचा केंद्रबिंदू राहिला.
आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी त्यांनी दोन वर्षांचा तुरुंगवास भोगला. तसेच २००४ ते २०१० या काळात शिक्षण अधिकार कायद्याच्या संदर्भातील चळवळीतही त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. विविध शिक्षक संघटनांच्या माध्यमातून त्यांनी संवाद, संघर्ष आणि अभ्यासपूर्ण मांडणीद्वारे शिक्षणक्षेत्रात व्यापक चळवळ उभी केली.
डॉ. गुलाबराव राजे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना, “कॉ. प्रा. ठेकेदत्त हे शिक्षकांच्या सन्मानासाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व होते,” असे म्हटले. प्रा. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी, “अभ्यास आणि लोकशाही मूल्यांची सांगड घालणारे असे नेतृत्व दुर्मीळ झाले आहे,” अशी भावना व्यक्त केली.
त्यांची अंत्ययात्रा दि. २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता बोरिवली येथील त्यांच्या निवासस्थानाहून निघाली..
Rip