सर्प मित्र आणि पर्यावरण रक्षक राजेंद्र उर्फ राजू कोळी यांचे निधन.

Share

राजेंद्र उर्फ राजू कोळी

प्रतिनिधी :वैशाली महाडिक

मुंबई : उत्तर मुंबईतील प्रसिद्ध सर्प मित्र आणि पर्यावरण रक्षक राजेंद्र उर्फ राजू बाळाराम कळी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास निधन झाले. ते “राजू भाई सापवाला” म्हणून संपूर्ण मुंबई उपनगरात ओळखले जात होते.

राजू कोळी यांनी अंधेरी, वर्सोवा, मढ, मार्वे, मनोरी, उत्तन, भायंदर, वसई, पालघर, बोरिवली आणि दहिसर परिसरात सर्पमित्र म्हणून काम केले. कुठेही साप दिसल्यास नागरिक त्यांना तात्काळ संपर्क करत असत आणि ते स्वखर्चाने घटनास्थळी पोहोचून सर्प पकडून त्याची सुरक्षित सुटका करीत असत.

ते केवळ सापच नव्हे, तर घोरपड आणि इतर जंगली प्राणीही लोकवस्तीमधून पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडत असत. त्यांनी एकदा बॉलीवूड अभिनेता संजय दत्त यांच्या घरातूनही साप पकडला होता.

राजू कोळी यांनी निस्वार्थपणे, विनामोबदला आणि समाजहितासाठी आपले आयुष्य समर्पित केले. सर्प पकडताना अनेकदा त्यांना नाग आणि रसेल वायपर सारख्या विषारी सापांनी दंश केला, तरीही त्यांनी धैर्याने आपले कार्य सुरू ठेवले. ते नेहमी सोबत सर्पदंशावरील औषध आणि इंजेक्शन बाळगत असत.

ते पोलीस, अग्निशमन दल आणि वनविभागाच्या मदतीला नेहमी तत्पर असायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि मुलगा रॉक्सन कोळी असा परिवार आहे. रॉक्सन कोळी हेही वडिलांप्रमाणे सर्प मित्र म्हणून ओळखले जातात.

८ ऑक्टोबरच्या रात्री उशिरा मढ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. समाजातील अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, पर्यावरणप्रेमी समाजासाठी ही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.



Share

2 thoughts on “सर्प मित्र आणि पर्यावरण रक्षक राजेंद्र उर्फ राजू कोळी यांचे निधन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *