साठे महाविद्यालयात विद्यार्थ्यांना इतिहासाचा जिवंत अनुभव.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

मुंबई : चारकोप सह्याद्रीनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी दिनांक १८ रोजी विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयास शैक्षणिक क्षेत्रभेट दिली. या भेटीदरम्यान महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे आयोजित “प्राच्यविद्या विषयावरील ऐतिहासिक प्रदर्शन” विद्यार्थ्यांनी आवर्जून पाहिले.

या प्रदर्शनात भारताच्या प्राचीन इतिहासाशी संबंधित भौतिक व लिखित साधनांचे पुरावे, शिलालेख, नाणी, हस्तलिखिते तसेच मध्ययुगीन आणि ब्रिटिशकालीन इतिहासाशी निगडित विविध ऐतिहासिक वस्तू व दस्तऐवज मांडण्यात आले होते. या सर्व पुराव्यांच्या माध्यमातून इतिहास कसा घडत गेला, त्याचा समाजजीवनावर कसा प्रभाव पडला आणि ऐतिहासिक संशोधनात पुराव्यांचे महत्त्व काय आहे, याची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व सखोल माहिती मिळाली.

इतिहास केवळ पुस्तकांपुरता मर्यादित नसून, तो समजून घेण्यासाठी ऐतिहासिक पुरावे हे विश्वासार्ह साधन ठरतात, याची जाणीव विद्यार्थ्यांना या प्रदर्शनातून झाली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी जिज्ञासा वाढते, निरीक्षणशक्ती विकसित होते तसेच अभ्यासक्रमातील घटक अधिक सुलभ आणि रंजक पद्धतीने समजतात. प्रत्यक्ष पाहणीमुळे विद्यार्थ्यांना ऐतिहासिक घटनांचा जिवंत अनुभव मिळाला, हे या क्षेत्रभेटीचे विशेष फलित ठरले.

या शैक्षणिक क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांसमवेत सहाय्यक शिक्षिका निलम जगताप उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांसाठी ही भेट ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि स्मरणीय ठरली.


Share

3 thoughts on “साठे महाविद्यालयात विद्यार्थ्यांना इतिहासाचा जिवंत अनुभव.

  1. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक घटनांचा जिवंत अनुभव मिळाला, इतिहासात खरच खुप काही घडल यांचा जिवंत पुरावा मुलाना दिसला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *