एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई : साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या जैवविविधता संवर्धन संशोधन केंद्रातर्फे युवक ‘पर्यावरण छावणी’ साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर, तालुका माणगाव, जिल्हा रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे. दिनांक 3 ते 5 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित या 3 दिवसीय निवासी युवक ‘पर्यावरण छावणी’चा उद्देश पर्यावरणीय संकटांच्या आव्हानांना सामोरे जाण्यास युवकांना सक्षम बनवणे हा आहे. जैवविविधता अभ्यासक पार्थ बापट हे या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक आहेत.
पर्यावरणीय प्रश्नांचे ऐतिहासिक, सामाजिक-आर्थिक व वैज्ञानिक आकलन, स्थानिक पर्यावरणीय समस्यांची ओळख व विश्लेषण, पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास, पर्यावरण व्यवस्थापन क्षेत्रातील करिअर संधी अशा विविध विषयांवर या शिबिरात मार्गदर्शन मिळणार आहे. निसर्गभ्रमंती, निसर्गखेळ, गावभेटी, चित्रपट, चर्चा, प्रकल्प अशा विविध स्वरूपात वरील विषय या शिबिरात शिकता येणार आहेत. पर्यावरण संकल्पना (जैवविविधतेवर विशेष भर), मानव–पर्यावरण यांचे ऐतिहासिक नाते (Ecosystem Services), कृषी व औद्योगिक समाजांचा पर्यावरणावर परिणाम, बदलत्या पर्यावरणाचा मानवी जीवनावर प्रभाव, पर्यावरणीय ऱ्हासाचे परिणाम व उपाय या विषयांवर तज्ज्ञ या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.
वरील तीन दिवसीय निवासी युवक ‘पर्यावरण छावणी’चा कालावधी हा मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत असणार आहे. 18 ते 30 वयोगटासाठी खुल्या असलेल्या या पर्यावरण छावणीचे प्रवेश शुल्क विद्यार्थ्याकरिता (PG) पर्यत 1000 रुपये, इतरांना 1500 रुपये इतके आहे. मर्यादित जागा असलेल्या या पर्यावरण छावणीची नोंदणी सुरू झाली असून नोंदणीसाठी स्मारक कार्यालय – 7776937844 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जैवविविधता संवर्धन व संशोधन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रीय स्मारकांकडे अशाप्रकारे अनेक संस्था किंवा इतर संघटनांनी कार्यक्रम आयोजित करून राबवायला हवेत जेणेकरून हुतात्म्यांच्या नावे असलेली सदर स्मारकं जिवंत राहतील कारण प्रशासनाने अनेक स्मारकं बांधली असून काही पर्यटन स्थळं आहेत तर काही स्मारकांकडे संबंधित प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष आहे.