सुधारित ‘उडान’ योजना मंजुर..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -एस.एन.अली

मुंबई : देशातील हवाई प्रवास अधिक सुलभ, परवडणारा आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रादेशिक संपर्क योजनेच्या सुधारित ‘उडान’ (UDAN) योजनेला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे दुर्गम, आदिवासी आणि अल्पसेवित भागांमध्ये हवाई संपर्काला मोठी चालना मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत देशभरात १०० नवीन विमानतळ विकसित करण्यात येणार असून, डोंगराळ राज्ये, केंद्रशासित प्रदेश, बेटांवरील भाग, ईशान्य भारत आणि आकांक्षी जिल्ह्यांमध्ये २०० हेलिपोर्ट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दुर्गम भागांपर्यंत जलद वाहतुकीचे साधन उपलब्ध होणार आहे.

विमानतळ विकासासाठी ‘चॅलेंज मोड’चा अवलंब करण्यात येणार असून, राज्ये व केंद्रशासित प्रदेश त्यांच्या गरजेनुसार विमानतळांची नावे सुचवतील. यामुळे पायाभूत सुविधा विकासाला वेग मिळण्याची अपेक्षा आहे.

तसेच, विमानतळांच्या संचालन व देखभालीसाठी तीन वर्षांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. राज्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र चौकट तयार करण्यात येणार आहे.

या योजनेमुळे टियर-२ आणि टियर-३ शहरांमधील प्रवाशांना अधिक परवडणाऱ्या दरात हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’चा कालावधी तीन वर्षांवरून पाच वर्षांपर्यंत वाढविण्यात आला आहे, ज्यामुळे नव्या मार्गांना आर्थिक स्थैर्य मिळणार आहे.

याशिवाय ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत देशांतर्गत विमान खरेदीला प्रोत्साहन देण्यात येणार असून, विमाननिर्मिती क्षेत्रालाही चालना मिळणार आहे.

या योजनेमुळे देशातील प्रादेशिक हवाई संपर्क सुधारून दुर्गम भागांमध्ये आर्थिक विकासाच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.जुहू विमानतळाचे संचालक सोनम नुरबू यांनी सांगितले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *