प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई::लोकांचा सिनेमा चळवळ’ आणि विविध जनसंघटनांच्या वतीने ता.9 रोजी बहुजनांची अभिव्यक्ती आणि संस्कृती नाकारणाऱ्या सेन्सॉर बोर्ड” विरोधात “राज्यस्तरीय सेन्सॉर बोर्ड विरोधी” परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील मुंबई मराठी पत्रकार संघात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ही परिषद होत असून याच ठिकाणी दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत ‘चल हल्ला बोल’ या मराठी चित्रपटाचा विनामूल्य ट्रायल शो आयोजित करण्यात आला आहे.
परिषदेला ज्येष्ठ शोध पत्रकार निरंजन टकले, अभिनेते किरण माने, ज्येष्ठ रंगकर्मी प्रतिभा मतकरी, अभिनेते यशपाल शर्मा, प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक अविनाश दास, चल हल्ला बोल चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक महेश बनसोडे, ऍड.नितीन सातपुते, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, आमदार जिग्नेश मेवाणी, लोकशाहीर संभाजी भगत यांनी या परिषदेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. विविध रिपब्लिकन गट आणि पँथर्स संघटनाही परिषदेत सामील होत आहेत.
‘लोकांचे दोस्त’ रवि भिलाणे,पत्रकार संजय शिंदे, पँथर सुमेध जाधव, कॉम्रेड सुबोध मोरे, पँथर डॉ. स्वप्नील ढसाळ, कष्टकऱ्यांचे नेते विठ्ठल लाड, ज्योती बडेकर, अभिनेत्री प्रतिभा शर्मा, संगीता ढसाळ, संभाजी ब्रिगेडचे प्रमोद शिंदे आदींच्या पुढाकाराने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला महाराष्ट्राच्या विविध भागातून रंगकर्मी उपस्थित राहणार असून मुंबईकर जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.