प्रतिनिधी :मिलन शहा
.
सुरक्षा असलेल्या व्यक्तीच असुरक्षित तर सामान्य व्यक्तींच्या सुरक्षेचे काय?
कायदा व सुव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास उडाला; मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे.
मुंबई, अभिनेता सैफ अली खान यांच्यावर रात्री त्यांच्या घरात झालेला जिवघेणा हल्ला ही अत्यंत गंभीर घटना आहे. वांद्र्यासारख्या भागात अशा प्रकारची ही तीसरी घटना घडलेली आहे. आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या, अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार व आता सैफ अली खानवरील हल्ला. सैफ अली खानवरील हल्ल्याने मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेचे पुन्हा धिंडवडे निघाले असून खाजगी सुरक्षा असलेल्या व्यक्ती सुद्धा असुरक्षित असतील तर सामान्य व्यक्तींच्या सुरक्षेचे काय, असा सवाल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महत्वाची गोष्ट म्हणजे वांद्र्यासारख्या भागात लोकांचा व पोलिसांचा भरपूर वावर असतानाही हल्ले होत आहेत. गुन्हेगारांना पोलिसांची भिती राहिलेली नाही. मुंबई पोलिसांचा लौकीक मोठा आहे पण राजकीय हस्तक्षेप वाढल्याने पोलिसांचे मानसिक खच्चिकरण होत आहे. सत्ताधारी पक्षातील आमदार पोलिसांच्या पत्नीबद्दल अपमानजनक वक्तव्ये जाहीरपणे करतात, पोलिसांना बदलीच्या धमक्या दिल्या जातात त्यामुळे मुंबई पोलिसांच्या धाक राहिलेला नाही. मुंबईसह राज्यातील परभणी, बीड मधल्या घटना, पुण्यातील कोयता गँगचे हल्ले हे राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे लक्षण आहे. कायदा व सुव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास उडाला आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना यावर उत्तर द्यावे लागेल. सैफ अली खानवरील हल्या प्रकरणी त्वरित कारवाई करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा करावी.
राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना, गुंडांनी मंत्रालयाच्या आवारात रिल्स बनवणे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढणे, सामाजिक ध्रुवीकरण आणि हिंसेचे राजकारण वाढणे या सर्व गोष्टींमुळे गुन्हेगारांच्या मनातून कायद्याची भीती नाहीशी झाली आहे. राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत असा प्रश्न पडतो. पोलिसांची जरब बसेल, गुप्तचर विभाग अपयशी होणार नाही व पोलीसांचा आदर व स्वातंत्र्य कायम राहिल याकडे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी लक्ष दिले पाहिजे असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.