एसएमएस-प्रतिनिधी-उत्कर्ष बोर्ले
मुंबई महापालिकेसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत लढणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. मात्र ज्या ठिकाणी पक्षाला समाधानकारक जागा मिळणार नाहीत, तिथे स्वबळावर उमेदवार निवडून आणा, असे आवाहन त्यांनी केले.महाड येथील चांदे मैदानावर झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या ६९ व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. मुसळधार पावसातही हजारो कार्यकर्ते उपस्थित राहून पक्षाचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. परिवर्तन कला महासंघाच्या कलाकारांनी सादर केलेल्या भीमगीतांनी कार्यक्रमाला उत्साहाचे स्वर लाभले.कार्यक्रमाच्या प्रारंभी ना आठवले यांनी ऐतिहासिक चवदार तळ्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सभेच्या अध्यक्षस्थानी रिपाइं राज्याध्यक्ष राजाभाऊ सरवदे होते. मंचावर राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले उपस्थित होते. त्यांनी चवदार तळ्याचे सौंदर्यीकरण व जलशुद्धीकरणासाठी अमृतसर गोल्डन टेंपलच्या धर्तीवर प्रकल्प उभारण्याची घोषणा केली.
ना. आठवले म्हणाले, “२०२७ मध्ये चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक शताब्दी वर्षानिमित्त महाडचे रुपडे पालटण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून भरीव निधी आणण्यात येईल.”
कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे सांगत त्यांनी पुढे म्हटले की, “फक्त बौद्धवाड्यांपुरते मर्यादित न राहता सर्व समाजातील लोकांना सोबत घ्या आणि प्रत्येक गावात रिपब्लिकन पक्षाची शाखा स्थापन करा.”
त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या खुल्या पत्राचा उल्लेख करत सांगितले की, “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा कोणत्याही एका जाती किंवा धर्माचा पक्ष नसून सर्व समाज घटकांचा पक्ष आहे.”
कार्यक्रमात सौ. सीमाताई आठवले आणि पुत्र जीत आठवले यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन गौतम सोनवणे यांनी केले.
कार्यक्रमाला राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, कार्याध्यक्ष बाबुराव कदम, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रकाश मोरे, रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
U r their source?