
प्रतिनिधी : मिलन शहा
मीरा-भाईंदर :दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मीरा-भाईंदरकरांसाठी अभिमानाचा क्षण येऊन ठेपला आहे. उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि मा. ना. श्री. प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांच्या पाठपुराव्यामुळे १८० कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे भव्य कलादालन मीरा -भाईंदर शहरात उभारण्यात आले आहे. १७ नोव्हेंबर रोजी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने हे कलादालन नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
१८ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर शालेय विध्याथ्यांसाठी मोफत प्रवेश, नवीन तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी हा हेतू !
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये शालेय विध्यार्थ्यांना खेळण्यासाठी नवीन टेक्नोलॉजीवर आधारित एआय यंत्रणेचा वापर करून तयार करण्यात आलेले दालन (किड्स झोन) १८ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या दरम्यान मिरा-भाईंदरमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. परंतु त्यासाठी पूर्व नोंदणी करणे अनिवार्य असेल. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये विज्ञानाचे महत्व विध्यार्थ्यांना कळावे आणि नवीन तंत्रज्ञानाची ओळख पटावी हा या मागील हेतू असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
कलादालनाचे आकर्षण :
या कलादालनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बाळासाहेब ठाकरे यांचा होलोग्राम साकारण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या जीवनप्रवासावर, विचारधारेवर आणि शिवसेनेच्या स्थापनेच्या इतिहासावर आधारित प्रदर्शने येथे पहायला मिळणार आहेत.
या कलादालनामुळे कलाप्रेमी, कलाकार, तसेच लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना सर्जनशीलता, संस्कृती आणि मनोरंजनाचा संगम एकाच छताखाली अनुभवता येणार आहे. डिजिटल इंट्रेक्टिव्ह माध्यमांद्वारे बाळासाहेबांच्या कार्याची ओळख आणि त्यांची भाषणे या कलादालनात नागरिकांना अनुभवता येणार आहेत.
आयईएस, आयपीएस, आयएनएस, युपीएससी, एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाग्र मनाने अभ्यास करण्यासाठी, त्यांच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी ‘स्टडी झोन’ या कलादालनात तयार करण्यात आलेले आहे. तसेच जेष्ठ नागरिकांना ऐकायला आवडणाऱ्या जुन्या गाण्यांचा संग्रह देखील या कलादालनात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
या कलादालनात मल्टिमिडीया/ ऑडियो विज्युअल प्रदर्शन, डिजिटलाईझेशन, दृश्य व ध्वनी यंत्रणा यांचा समावेश तसेच अॅम्फीथिएटर, संग्रहालय, ई-लायब्ररी, संगीत केंद्र, अभ्यासिका, बहुउद्देशीय हॉल, कॉन्फरन्स रूम, कॅफेटेरिया, परिसरात लँडस्केप गार्डन, वातावरण अनुरूप सुविधा (solar energy, rainwater harvesting, mini garbage recycling) इत्यादी सोयीसुविधा या कलादालनात नागरिकांना अनुभवता येणार आहेत.
स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाबद्दल सांगताना मंत्री सरनाईक म्हणतात की,
“स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन हे महाराष्ट्रातील स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे असलेले सर्वप्रथम कलादालन असणार आहे. आणि हे मीरा-भाईंदरमध्ये सुरू होत असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. कला, संस्कृती आणि नव्या पिढीच्या सर्जनशीलतेला वाव देणारे हे केंद्र म्हणजे शहराच्या प्रगतीचा नवा टप्पा आहे. स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने मीरा-भाईंदरकरांना दिलेल्या या भेटीमुळे शहराची ओळख राज्यभर वेगळी निर्माण होईल. मीरा -भाईंदर शहरातील जनतेला आता काळा घोडा फेस्टीव्हल किंवा मुंबईतील इतर ठिकाणी कलेचा आनंद घ्यायला जायची गरज भासणार नाही कारण त्या सर्व कलांचा अनुभव त्यांना या कलादालनात घेता येणार आहे. मला मीरा-भाईंदर मधील जनतेने दिलेल्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे मी चार वेळा या शहराचा आमदार आणि त्यानंतर आता या महाराष्ट्राचा परिवहन मंत्री झालो आहे. या कलादालनाच्या मार्फत दिवाळी दरम्यान माझ्याकडून ही एक भेट मी मीराभाईंदरमधील जनतेला देत आहे. कलाप्रेमींसाठी हे कलादालन नक्कीच एक पर्वणी ठरेल असा माझा विश्वास आहे.”
Good news
Good