
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई : तिकीट चेकिंग परिवार मुंबई तर्फे गुडीपाडव्याच्या पूर्वसंध्येला माटुंगा (पूर्व) येथील मध्य रेल्वे ऑफिसर क्लब हॉलमध्ये हिंदू नववर्ष स्वागत सोहळा आणि वर्षभर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तिकीट चेकिंग कर्मचाऱ्यांचा सन्मान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी भव्य नववर्ष शोभायात्रेने झाली. या शोभायात्रेत विविध अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. माटुंगा स्टेशन परिसरातील श्री गणेश मंदिरात पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. वरळी कोळीवाड्यातील प्रसिद्ध बँड, तुतारी वादन आणि भगवे फेटे परिधान केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले.
शोभायात्रा हॉलमध्ये पोहोचताच मान्यवरांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यानंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात परिवारातील महिला व लहान मुलांनी नृत्य सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले, तसेच सुरझंकार गायकांनी सुमधुर गीते सादर केली.
या प्रसंगी डीआरएम हिरेश मीना यांच्या हस्ते वर्षभर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १३५ तिकीट चेकिंग कर्मचाऱ्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट टीसी ऑफिस म्हणून पनवेल आणि भायखळा सीटीआय कार्यालयांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्काराने सुनील कुमार बी यांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय विविध मान्यवर अधिकारी, निवृत्त अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांनी उपस्थित राहून तिकीट चेकिंग परिवाराला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन परिवाराचे अध्यक्ष संजय आंग्रे, कार्याध्यक्ष राजन सुर्वे, सचिव डी. व्ही. चिंदरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नियोजनामुळे शक्य झाले. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी कलाकारांनीही आपली कला सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
संपूर्ण कार्यक्रम उत्साह, एकोप्याची भावना आणि परंपरेचे जतन यांचा सुंदर मिलाफ ठरला.
Very good
Congrats