नवी मुंबई येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -कृष्णा वाघमारे

घणसोली : शिवसाई माथाडी कामगार मित्र मंडळ, घणसोली यांच्या वतीने सलग २१व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन दिनांक २९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घणसोली, सेक्टर ४ येथील सिडको मैदानात करण्यात आले होते. सप्ताह काळात काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन व हरिजागर इत्यादीचे आयोजन करण्यात आले. बुधवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी हभप साहेबराव महाराज पढेर,सासवड यांच्या सुश्राव्य काल्याच्या किर्तनाने हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. काल्याच्या कीर्तनात हभप पढेर महाराज यांनी मन, बुद्धी व एकाग्रता यांचा संगम म्हणजेच काला असे काल्याचे महत्व स्पष्ट करून गरिबी, रोगराई व जन्म मृत्यू ह्या मानवीय वेदना असल्याचे विषद केले. यावेळी राज्याचे वनमंत्री मा ना श्री गणेशजी नाईक साहेब यांनी भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले व आगामी काळातील सरकारच्या २५० कोटी वृक्षलागवड उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. निसर्गावरील अतिक्रमणामुळे ऋतुचक्र बिघडत चालले असून वातावरण संतुलित ठेवण्यासाठी निसर्गरक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. तसेच नवी मुंबईला पूर्वीपासूनच अध्यात्मिक वारसा लाभलेला असून हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून ही संस्कृती जोपासणाऱ्या शिवसाई माथाडी कामगार मित्र मंडळाचे संस्थापक श्री कृष्णा बापू पाटील व सौ उषा कृष्णा पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह कालावधीत हभप भागवताचार्य दिनेश महाराज औटी, हभप कानिफनाथ महाराज बांगर, हभप महेश महाराज घुडे, धर्मसिंधू महामंडलेश्वर स्वामी शांतानंद सरस्वती महाराज, हभप संगीताताई महाराज काठोले, हभप शिवचैतन्य महाराज मोरे, हभप प्रवीण महाराज शेलार यांची किर्तनसेवा संपन्न झाली. मंगळवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी भव्य दिंडी सोहळा आणि दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसाई अखंड हरिनाम सप्ताह समितीच्या वतीने संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम व नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून वारकरी परंपरा आणि अध्यात्मिक वारसा, शिवसाई माथाडी कामगार मित्र मंडळांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमातून गेली अनेक वर्षे जोपासत असल्याचे मंडळाचे संस्थापक कृष्णा पाटील यांनी सांगितले.


Share

3 thoughts on “नवी मुंबई येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न.

  1. मोठी वृक्ष तोडुन लहान वृक्षारोपण करणे खरच गरज आहे जर मोठी वृक्ष तोडलीच नाहि तर नाहि का चालनार खरतर माणसांना आपल्या गरजा कमी केल्याशिवाय खर लक्ष्य साध्य होणार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *