बालदिनी रंगला टच संस्थेचा सृजनशीलतेचा उत्सव!

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

१५ वी ‘क्रिएटिव्ह टच’ चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली*

मुंबई :बालदिनाच्या निमित्ताने TOUCH – Turning Opportunities for Upliftment and Child Help या संस्थेच्या वतीने आयोजित १५ वी ‘क्रिएटिव्ह टच’ चित्रकला स्पर्धा प्रबोधनकार ठाकरे उद्यान, शिवडी येथे अतिशय उत्साहात आणि रंगतदार वातावरणात पार पडली.

“कलेतून समाजभाव, मुलांच्या स्वप्नांना नवी उंची” या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत विविध सामाजिक पार्श्वभूमीतील सुमारे ३३८ विद्यार्थी सहभागी झाले. शहरातील सरकारी, निमसरकारी, खाजगी शाळांबरोबरच टच ब्रिज स्कूल आणि इतर सामाजिक संस्थांतील मुलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

चौथी ते सहावी, सातवी ते नववी आणि दहावी ते बारावी या तीन गटांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत मुलांनी सामाजिक विषयांवर, निसर्ग, पर्यावरण, बालहक्क, मानवता आणि स्वप्नांच्या रंगांनी आपल्या कल्पनाशक्तीला मुक्त वाव दिला. रंगांच्या माध्यमातून समाजाविषयीची जाणीव, करुणा आणि सकारात्मकता मुलांच्या प्रत्येक चित्रात झळकली.

दुपारी २ ते ३ या वेळेत स्पर्धकांची नोंदणी झाल्यानंतर ३ ते ५ या वेळेत स्पर्धा पार पडली. या दरम्यान संपूर्ण उद्यान परिसरात रंग, उत्साह आणि सर्जनशीलतेचा मेळ दिसून येत होता.

स्पर्धेनंतर टच बालग्राम निवासी प्रकल्पातील विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. देशभक्तीपर गीतांपासून पारंपरिक नृत्यांपर्यंत, मल्लखांब व रोपमल्लखांब अशा विविध सादरीकरणांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून कॅक्टस कम्युनिकेशनचे श्रीमती जिग्ना मेहता, टचच्या सेवावृत्ती डॉ. दाक्षायणी मेनन उपस्थित होते, जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचे परीक्षक राहूल सावंत, सुरज कांबळे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांपच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
यामध्ये प्रथम पारितोषिक ₹१०,०००, द्वितीय ₹५,०००, तृतीय ₹२,५०० आणि उत्तेजनार्थ ₹१,००० अशी रक्कम विजेत्यांना देण्यात आली. पारितोषिक विजेते पुढीलप्रमाणे
चौथी ते सहावी
प्रथम – संयुक्ता तरे
द्वितीय – वेद ढोके
तृतीय – ऋग्वेद घाडी
उत्तेजनार्थ – अक्षरा पाटील
सातवी ते नववी
प्रथम – स्वरा तरे
द्वितीय – रतुल मांडवकर
तृतीय – विराज शिगवन
उत्तेजनार्थ – संतुष्ट विश्वकर्मा
दहावी ते बारावी
प्रथम – रोनित वैश्य
द्वितीय – मनिष पाताडे
तृतीय – शुभम गुप्ता
उत्तेजनार्थ – विवान कुलकर्णी

या निमित्ताने टच संस्थेचे समन्वयक श्री. उमाकांत पांचाळ यांनी सांगितले,
“मीसुद्धा सक्षम आहे, मीसुद्धा स्पर्धा करू शकतो — हा आत्मविश्वास प्रत्येक मुलामध्ये रुजवणे, हाच ‘क्रिएटिव्ह टच’चा उद्देश आहे. समाजात सकारात्मक बदल घडवायचा असेल, तर त्याची सुरुवात बालमनातूनच होते. म्हणून बालवयापासूनच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते.”

गेल्या १४ वर्षांपासून ‘क्रिएटिव्ह टच’ उपक्रमाद्वारे हजारो मुलांना सर्जनशीलतेचा आणि आत्मविश्वासाचा नवा प्रकाश मिळाला आहे. समाजातील सुस्थितीतील तसेच वंचित मुलांना एकाच व्यासपीठावर आणून “समतेचा आणि मैत्रीभावाचा रंग” अधिक गडद करण्याचा प्रयत्न टच संस्था या माध्यमातून करत आहे.

कार्यक्रमाचे नियोजन आयोजनासाठी प्रफुल पालांडे, शिवशंकर शेरे, टचचे सेवावृत्ती, सिद्धार्थ महाविद्यालय, केसी महाविद्यालय, बीटीटीसी महाविद्यालय,‌ एच.आर महाविद्यालय, ठाकूर महाविद्यालयाच्या सर्व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे समर्पित कार्य यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
बालदिनी साजरा झालेला हा सृजनशीलतेचा उत्सव मुलांच्या कल्पकतेने आणि टच संस्थेच्या संवेदनशील उपक्रमाने सर्वांच्या मनावर अविस्मरणीय ठसा उमटवून गेला.


Share

5 thoughts on “बालदिनी रंगला टच संस्थेचा सृजनशीलतेचा उत्सव!

  1. हा चांगला उपक्रम सातत्याने बरेच वर्षापासून टच संस्था राभवत आहे. ह्या निश्काम सेवेला टच संस्थेचा आभार आणी अशीच सेवा घडत राहो अशी प्रार्थना करतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *