
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे
मुंबई: 14 नोव्हेंबर — बालदिनाच्या औचित्याने प्रा.डॉ.एन.डी.पाटील विद्यालय,चारकोप कांदिवली सह्याद्रीनगर या शाळेत विविध उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. यामध्ये विशेष आकर्षण ठरला तो विद्यार्थ्यांचा खरी कमाई हा उपक्रम, ज्यातून मुलांमध्ये उद्यमशीलता, नियोजनकौशल्य आणि स्वावलंबनाची भावना प्रभावीपणे विकसित होताना दिसली.
कार्यक्रमाची सुरुवात स्कूल कमिटी सदस्य श्री. मदन चव्हाण आणि मुख्याध्यापिका सौ. जरे एस. एम. यांच्या हस्ते पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. विद्यार्थिनी कु. अथर्व मोरे हिने बालदिनाचे महत्त्व सांगत प्रभावी भाषण केले, तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समृद्धी साळुंखे हिने उत्तम रीतीने पार पाडले.
कर्मवीर इन्ट्रॅक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांनी ‘खरी कमाई’ या उपक्रमांतर्गत स्वतःच्या पिग्गी बँकेतून जमा केलेली रक्कम वापरून आवश्यक साहित्य खरेदी केले. विविध खाद्यपदार्थ स्वतः तयार करून आकर्षक पद्धतीने सजवलेल्या स्टॉल्समधून विक्री करण्यात आली. मेन्यू कार्ड, शेफ पोशाख, स्टॉल्सची सजावट—प्रत्येक गोष्टीत विद्यार्थ्यांचे बारकाईने केलेले नियोजन आणि सर्जनशीलता जाणवून येत होती.
पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मोठ्या गर्दीने स्टॉल्सला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पदार्थांची चव, सादरीकरण आणि मुलांचे आत्मविश्वासपूर्ण वागणे हे सर्वांनाच भावले.
रोटरी क्लब कांदिवली वेस्टच्या युथ डायरेक्टर सौ. रिमा वाही यांनी सर्व स्टॉल्सना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि परिश्रमांचे मनापासून कौतुक केले.
बालदिनानिमित्त स्लो सायकलिंग,संगीत खुर्ची अशा खेळांचेही आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला आणि आनंददायी वातावरण निर्माण केले.
बालदिनाचा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण, अर्थपूर्ण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरला. विशेषत: ‘खरी कमाईसारख्या उपक्रमामुळे मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव, उद्यमशीलता आणि स्वयंपूर्णतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Very good
छान
Good
But not related to First pm Jawahar Lal Nehru