साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात लिव्हिंग लॅबचे लोकार्पण..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

मुंबई : साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर येथे आयआयटी बॉम्बेच्या प्रोजेक्ट आऊटरिच अंतर्गत उभारलेल्या ‘लिव्हिंग लॅब’चे गुरुवारी लोकार्पण करण्यात आले. या लिव्हिंग लॅबमुळे तंत्रज्ञानाचा वापर करून हवामान बदल, शाश्वत ऊर्जा, पाणी संवर्धन या क्षेत्रांत समुदाय सहभागातून संशोधन, प्रशिक्षण व मॉनिटरिंग प्रणाली विकसित होणार आहे.

या वेळी बोलताना प्रकल्प प्रमुख राजाराम देसाई यांनी, “हा प्रकल्प केवळ एक कार्यक्रम नसून विज्ञान आणि तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत नेण्याच्या प्रवासाची सुरुवात आहे,” असे सांगितले. स्मारक परिसरात बसविण्यात आलेल्या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती घेऊन समाजात त्याचा प्रसार करणे हे या संकल्पनेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फेज-1 अंतर्गत बसविण्यात आलेल्या साधनांमध्ये––

✔ 4 kW सौर ऊर्जा नेट मीटरिंग प्रणाली

✔ पाणी बचतीचे हँडवॉश स्टेशन

✔ वीज न लागणारी गुरुत्वाकर्षण आधारित अल्ट्राफिल्ट्रेशन पिण्याचे पाणी व्यवस्था

✔ वीजविरहित भाजी-फळ साठवणूक ‘सब्जी कूलर’

या प्रणालींचे अधिकृत हस्तांतरण आयआयटी बॉम्बेकडून स्मारकाला करण्यात आले.

या वेळी मंचावर स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद निगुडकर, जैवविविधता संवर्धन व संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ आणि सचिव सिरत सातपुते उपस्थित होते.

कार्यक्रमाला महाड, गोरेगाव, माणगाव येथील महाविद्यालये व शाळांतील विद्यार्थी, प्राध्यापक आणि ग्रामीण विकास क्षेत्रात कार्य करणारे स्वयंसेवक उपस्थित होते.

या प्रकल्पामुळे ग्रामीण भागात शाश्वत तंत्रज्ञानाचा प्रसार होईल तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगांमधून शिकण्याची संधी मिळणार असल्याचे मत उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप लिव्हिंग लॅबची प्रत्यक्ष पाहणी करून करण्यात आला.


Share

2 thoughts on “साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात लिव्हिंग लॅबचे लोकार्पण..

  1. सर्व अप्रतिम,परंतु वेळोवेळी डागडुजी व्हावी हीच माफक अपेक्षा!…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *